भोईवाडा गाव पुनर्विकासाचा निर्णय तातडीने घ्या! शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी
भोईवाडा गावाच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबत तातडीने निर्णय घ्या, पुनर्विकासांमध्ये विकासकाकडून होणारी रहिवाशांची फसवणूक टाळण्यासाठी धोरणात सुधारणा करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन चर्चा केली.
महापालिका मालमत्तांच्या पुनर्विकासात विकासकाकडून आराखडय़ामध्ये वारंवार बदल करून रहिवाशांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे सुधारित आराखडय़ावर रहिवाशांची मंजुरी घेण्याबाबत धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. वरील सर्व विषयांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन आयुक्त भिडे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपस्थित महापालिका अधिकाऱयांना दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे, सार्वजनिक आरोग्य उपायुक्त शरद उघडे, आयुक्त कार्यालय उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्यासह संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते.
डॉक्टरांना नोटीस दिल्याने आरोग्य सेवेवर परिणाम
महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील 100 डॉक्टरांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पालिकेच्या रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवाय ग्लोबल रुग्णालयामधील आरक्षित बेड महानगरपालिकेला हस्तांतर करण्यासंदर्भात लवकर करार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Comments are closed.