संपूर्ण काश्मीरमध्ये बर्फाची 'पांढरी चादर' पसरली आहे

गुलमर्ग ते सोनमर्ग भागात पर्वतांवर हिमवृष्टी

वृत्तसंस्था/ श्रीनगर

काश्मीरच्या खोऱ्यांमधील गुलमर्ग ते सोनमर्ग पर्यंतच्या पर्वतांवर बुधवारी झालेल्या ताज्या हिमवृष्टीने येथील वातावरणाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. गुलमर्गमधील कांगदुरीपासून ते गुरेझ, सोनमर्ग आणि द्रास पर्यंतच्या उंच भागांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांत डोंगराळ भागात आणखी हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, तर मैदानी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गुलमर्गमधील कांगदुरी येथील हिमवृष्टीने पर्यटक आनंदित झाले आहेत. उंच शिखरांपासून ते उतारांपर्यंत सर्वत्र पांढरा बर्फ दिसत असल्यामुळे संपूर्ण परिसर एका सुंदर हिवाळी दृश्यात बदलला आहे. गुलमर्ग परिसर टेकड्या आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. आता ताज्या हिमवृष्टीमुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम केवळ पर्वतांपुरता मर्यादित नाही. उंच भागांतील हिमवृष्टीमुळे मैदानी प्रदेशातही थंडी वाढली आहे. तापमान 5 ते 6 अंशांनी कमी झाले असून, येत्या काही दिवसांत पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

आणखी हिमवृष्टी अपेक्षित

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर आणि दक्षिण काश्मीरच्या उंच भागांमध्ये मध्यम हिमवृष्टी अपेक्षित आहे. लडाखच्या उंच भागांमध्येही हिमवृष्टी होणार आहे. यापूर्वी, गुलमर्ग, गुरेझ, झोजिला, सोनमर्ग आणि द्रासच्या उंच भागांमध्ये हलकी हिमवृष्टी नोंदवली गेली होती. पुढील 24 ते 48 तास मैदानी प्रदेशांसाठीही महत्त्वाचे असतील. हवामान खात्याने येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पर्वतांमध्ये हिमवृष्टी आणि सखल भागांमध्ये पावसामुळे थंडी अधिक तीव्र होऊ शकते.

प्रशासनाकडून सूचना जारी

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर, स्थानिक प्रशासनाने एक सूचनापत्र जारी करून स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आणि सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हवामान अधिक बिघडल्यास कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत. पर्वतांमध्ये झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम मैदानी प्रदेशातील तापमानावरही झाला आहे. पारा 5 ते 6 अंशांनी खाली घसरला आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, काश्मीर आणि लडाखच्या मैदानी प्रदेशात थंडी वाढू शकते.

इतर राज्यांमध्येही थंडीची चाहुल

काश्मीरसोबत उत्तर भारतातील अन्य राज्यांमध्येही तापमानात घट होऊ लागल्याने थंडी पडण्याची चाहुल लागली आहे. मध्य प्रदेशातील 17 शहरांमध्ये किमान तापमान 15 अंशांच्या खाली घसरले आहे. अमरकंटक आणि करौंडीमध्ये पारा 12 अंशांच्या खाली आहे. बिहारमध्ये सकाळ आणि रात्री सौम्य थंडी असून, दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशामुळे उबदार वातावरण होते. तर, दुसरीकडे जमुई, मुंगेर आणि बांकासह पाच जिह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये बुधवारी किमान तापमान 5 अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र, दिवसभर उष्णता कायम आहे. पश्चिम राजस्थानच्या जिह्यांमध्ये कमाल तापमान 35 ते 38 अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.

Comments are closed.