मुंबईत एमपीएससीच्या दारात धडक द्यावी लागेल! आदित्य ठाकरे यांचे अल्टिमेटम, भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे!

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळत चालले आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना ही एकजूट तुटू द्यायची नाही, अशी हाक दिली. भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यासाठी वेळ आली तर मुंबईत एमपीएससीच्या दारात धडक द्यावी लागेल, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे दोघेही देशाचे भवितव्य खराब करायला निघाले आहेत, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला. भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असे ठणकावत आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. ‘भीमनवार यांचा राजीनामा झाला नाही तर कोणाचा’ अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी देताच गर्दीतून फडणवीसांचा असा आवाज घुमला. जर तुमची ताकद असेल, जिद्द असेल, हिंमत असेल, इच्छा असेल हे आंदोलन पुढे नेण्याची आणि हा आवाज बुलंद करण्याची तर पुढचे पाऊल टाकावे लागेल. 24 तासांत भीमनवार यांचा राजीनामा झाला नाही तर मुंबईत जाऊन एमपीएससीच्या दारात येऊन बसावे लागेल, असे नमूद करताना तयार आहात का, अशी हाक आदित्य यांनी दिली. त्यावर हो म्हणत जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी आमदार रोहित पवार, विश्वजीत कदम, कैलास पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.

‘प्रश्न विचारला की तुम्ही अर्बन नक्षल, देशद्रोही’

शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत बदल झाला पाहिजे. तुमच्या हातात अभ्यासाचे पुस्तक येते, त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारायला लागता. त्यावेळी तुम्ही भाजपसाठी अर्बन नक्षल बनता. देशद्रोही बनता. पण या राजवटीचा काळ फार थोडा राहिला आहे. आज आदिवासी मुलांना मुंबईत अमानुष पद्धतीने उचलले. ही हुकूमशाही राजवट आहे. तिला आपल्याला घालवावे लागेल.

व्होट चोर, नोट चोर, चंदा चोर, पेपर चोर, कोंबडी चोर, भविष्य चोर अशी सगळय़ा चोरांची टोळी आपल्या डोक्यावर बसली असेल तर हा देश आणि हे राज्य सुधारणार का? तुम्हाला उद्या नोकरी मिळालीच तर या स्थितीत तुम्ही स्वप्नातला महाराष्ट्र घडवू शकणार आहात का? सत्तेत बसलेल्या भ्रष्ट आणि गद्दार लोकांनी सगळंच बिघडवलंय!

Comments are closed.