दुष्काळ, आचारसंहितेमुळे यंदा दसरा महोत्सव साधेपणाने, कोल्हापूर जिल्हाधिकारी राठोड यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिक्षक/पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता तसेच दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर जिह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरात शाही दसरा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सव कालावधीत कोल्हापूर शहराला सुमारे 30 ते 40 लाख भाविक व पर्यटक भेट देतात. हा उत्सव कोल्हापूरच्या संस्कृती आणि परंपरांचा महोत्सव असल्याने याला देश तसेच जगभर अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाही 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूर दसरा महोत्सव 2026 अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा, हस्तकला, चित्रकला, पर्यटन, निबंध, रांगोळी स्पर्धा, नागरिकांसाठी चित्रनगरीची सफर, महिलांची बाइक रॅली त्याचबरोबर कोल्हापूरची शौर्यगाथा आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.

या महोत्सवांतर्गत 11 ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार आहे. या महोत्सवाचा जिह्यातील नागरिकांनी तसेच देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि हा दसरा महोत्सव जगप्रसिद्ध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केले आहे. या बैठकीला आयुक्त राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, तहसीलदार तेजस्विनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, वर्षा साळोखे आदी उपस्थित होते.

Comments are closed.