बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी; चिपळूण नगरपरिषदेचा निर्णय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने चिपळूण नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाजारपेठेतील फटाके विक्रीला आळा घालून सर्व फटाके विक्रेत्यांना एकाच ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच फटाक्यांचे स्टॉल बाजारपेठेत उभारले जात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यापूर्वी बाजारपेठेत आगीच्या घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

फटाके विक्रेत्यांसाठी लवकरच स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार असून, नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांकडून संबंधित जागेची पाहणी केली जाणार आहे. या ठिकाणी सर्व फटाके विक्रेत्यांना स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी फटाके खरेदी करता येतील आणि बाजारपेठेची सुरक्षितताही कायम राखता येणार आहे.चिपळूणच्या बाजारपेठेत कुठेही फटाक्यांची विक्री होणार नाही, याची नगरपरिषद प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती बांधकाम समितीचे सभापती कपिल शिर्के यांनी दिली.

Comments are closed.