सगळीकडची मोकळी मैदानं स्वतः च्या हातात घेऊन, भाजपला स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर आणायचे आहेत; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुलुंडमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या हडेलहप्पी धोरणावर हल्ला चढवला आहे. सगळीकडीची मोकळी मैदानं संस्थांच्या हातात घेऊन स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणायचा भाजपचा डाव आहे. आणि त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये मुंबईतील जवळपास १७ ते १८ मोकळी मैदानं ही भाजपने ढापली आहेत. आज ज्या प्लॉटवर आपण बसलेलो आहोत खरंतर या प्लॉटवर पेट्रोलपंप आणि गॅस स्टेशनही होऊ शकतं. आणि समोर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आरक्षण आहे ते न बदलता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचच राहू शकतं. इथे एक शाळा आहे. त्या शाळेला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून जागा देऊ केली आहे. ते मोकळ्या मैदानासाठी केलेलं असावं, हे आम्ही समजू शकतो. पण शाळेचं ते मोकळं मैदान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसंच ठेवून इथे खरंतर पेट्रोलपंप, गॅस स्टेशन सगळं येऊ शकतं. आणि ज्या प्लॉटवर आपण बसलोय तिथे खरंतर पेट्रोलपंपचं आरक्षण होतं ते नंतर गॅस स्टेशनचं केलं. त्याचा अॅडव्हान्टेज हा आहे की, हे तुम्ही हायवेला जोडू शकता. एखाद्या आतल्या गल्लीत मोठी जागा ढापून भाजपवाले पेट्रोलपंपच्या नावाखाली काय-काय करत आहेत कोणालाच माहिती नाही. पण एकंदरीत मुंबईत आपण पाहतोय इथे मुलुंडमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा पेट्रोलपंप दाखवून पुढे ढापणार. पुढचे १०-१२ प्लॉट्स असेच भाजपच्या वेगवेगळ्या संस्थेने ढापले आहेत. भाजपच्या लोकांनी ढापलेले आहेत. अंधेरीत छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आम्ही सत्तेत असताना १० वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्यातर्फे बनवलं होतं. मोकळं मैदान आहे, खेळाचं मैदान, क्रिकेचं मैदान आहे. सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आहे. सगळं काही आहे. पण ते देखील त्यांना एका भाजपच्या आमदाराच्या घशात घालायचं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

एकंदरीत आपण पाहिलं तर बेस्टचे २२ आगार हे वेगळेच, मुलुंडचा हा प्लॉट, समोरचा मुलुंडचा प्लॉट, हे दोन प्लॉट भाजपला स्वतःच्या घशात घालायचे आहेत. नेव्हील डिसोझा फुटबॉल टर्फ घ्यायचा आहे. अंधेरीतला एक प्लॉट, जुहूमधले दोन प्लॉट आणि सगळीकडची ही मोकळी मैदानं घेऊन भाजपच्या संस्थांच्या हातात घेऊन इथे स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणायचा जो डाव आहे त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्याचं जे आंदोलन आहे, सगळ्याच मुंबईकरांना मी विनंती करतोय, आपण सर्वांनी या. कारण इथे कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय नाहीये. तुम्ही कुठल्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपलाही मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की, भाजपच्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप जेवढी जेन-झी विरोधी आहे की, हा जेन-झीने पण विचार केला पाहिजे की, मुंबईत मैदानचं निघून गेली, मुंबईतली मैदानचं सगळी गायब केली भाजपने तर, मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊ आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. पहिला टप्पा उद्या नेव्हील डिसोझाला आहे. आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.