मुंबईकरांचं रक्त मिंधे, भाजप विकायला चालले आहेत; रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबईकरांचं रक्त मिंधे किंवा भाजप हे विकायला चालले आहेत. आतापर्यंत आपल्या रक्तपेढ्या मोफत होत्या. दुर्दैवं असं आहे की, आता त्याच्यावर भाजप किंवा मिंधे यांचा डोळा आहे. आणि मुंबईचं रक्त, शिवसैनिकांचं रक्त किंवा या रक्तपेढ्यांमध्ये ज्या-ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्या रक्तातून यांना पैसे कमवायचे आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबई महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबईतील मोकळी मैदानं रेसिडेन्शियल करण्याच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरे यांनी थेट उद्योगपतीच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. उद्याचे सुधार समितीतील प्रस्ताव रद्द झाले नाही तर आणखी आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेत गेली पाच महिने हे नवीन सरकार बसल्यानंतर आम्ही सातत्याने श्वेतपत्रिकेची मागणी करत आहोत. रस्ते घोटाळा असेल तुम्ही पंपिंग स्टेशनपासून जे काही सगळे जे काही घोटाळे केलेत त्यावर आम्ही श्वेतपत्रिका मागत आहोत. शाळेच्या सात भूखंडांचे त्यांनी खासगीकरण केलेले आहेत. अनेक गोष्टी त्यांनी गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात केलेल्या आहेत. त्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि असाच खासगीकरणाचा प्रयत्न आहे. २० मे रोजी जी महापालिकेच्या सुधार समितीच बैठक होणार होती ती अचानक १९ मे रोजी संध्याकाळी रद्द केली गेली. सहा की सात महत्त्वाचे विषय होते. आणि डील न झाल्यामुळे ही १९ तारखेची बैठक रद्द केली गेली, असं ऐकलं आहे. आता डील हे कोणाचं होतं, काय होतं? हा सगळा घोटाळा आम्ही टप्प्या-टप्प्याने मुंबई समोर आणू आणि कोर्टात देखील जाणार आहोत. पण उद्याची सुधार समितीची बैठक आहे २० तारखेचे जे काही विषय होते ते त्यांनी उद्या आणलेले आहेत. आणि उद्या सुधार समितीत जे काही विषय आहेत ते भयानक आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी घोटाळ्याला वाचा फोडली आहे.

मुंबई महापालिकेच्या ज्या काही रक्तपेढ्या आतापर्यंत मुंबई महापालिकाच चालवायची. या सगळ्या रक्तपेढ्या रुग्णांसाठी मोफत असायच्या. रुग्णाला कुठेही शुल्क चावले जायचे नाही. अनेकदा असे ऐकतो मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला आहे. आणि ज्या-ज्या वेळेला अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेला शिवसैनिकांनी पुढे येऊन रक्तदान करून या सगळ्या रक्तपेढ्या भरून काढलेल्या आहेत. रक्त मुंबईचं, अनेकदा रक्त शिवसैनिकांचं, कुठेही जात-पात धर्म-भाषा न बघता अनेकदा आम्ही त्या रुग्णांना देत असतो. आज भाजपच्या सरकार बसल्यानंतर आणि खासकरून सुधार समितीमध्ये मिंधेचे अध्यक्ष असताना मुंबई महापालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत ज्या रुग्णांसाठी आतापर्यंत मोफत असायच्या त्यांचं खासगीकरण केलं जात आहे. पण आता त्यांना ही सुविधा दिलेली आहे की, प्रत्येक रक्ताच्या पिशवीसाठी ११०० रुपये आणि पुढे १६०० ते २००० रुपये प्रत्येक पिशवी असे शुल्क घेऊ शकणार आहेत. म्हणजे आमचं मुंबईकरांचं रक्त एकतर मिंधे किंवा भाजप हे विकायला चालले आहेत. हे या प्रस्तावावरून स्पष्ट होत आहे. भापजने उद्या यावर भाष्य करावं की, तुम्हाला मुंबईचं रक्त विकायचं आहे का? आतापर्यंत आपल्या रक्तपेढ्या मोफत होत्या दुर्दैवं असं आहे की आता त्याच्यावर भाजप किंवा मिंधे यांचा डोळा आहे. आणि मुंबईचं रक्त, शिवसैनिकांचं रक्त किंवा या रक्तपेढ्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्या रक्तातून यांना पैसे कमवायचे आहेत, एवढं घाणेरडं काम हे उद्या मिंधेंचे अध्यक्ष आणि मिंधेंचा जो काही प्रस्ताव आहे तो यातून कळतोय.

मिंधेंना मुंबई विकायची आहे, मुंबईचा जो काही भूखंड आहे त्यातून श्रीखंड खायचं आहे, हे आम्ही आधीपासूनच बोलत आलो आहोत. मोकळी मैदानं मुबईत ठेवायचीच नाहीयेत. आणि हे उद्याच्या तीन प्रस्तावातून दिसत आहे. प्रस्ताव क्रमांक तीन हा वांद्रे पूर्वतील एक आरजी प्लॉट आहे. गेली दहा वर्षे तिथे मुंबई फुटबॉल असोसिएशनचं फुटबॉलचं ग्राउंड राहिलेलं आहे. तिथे सगळ्या टुर्नामेंट होतात. युवा प्रेसिडेंस लीगमध्ये साडेसात हजार मुलांपेक्षा जास्त मुलं त्यात सहभागी होतात. कोण मुंबईसाठी खेळतं, कोण देशासाठी खेळतं आणि मुंबईतल्या या मैदानावर एक रुपया सुद्धा शुल्क फुटबॉलच्या सामन्यांसाठी घेतलं जात नाही. दुर्दैवाने तिथे यांना एक्झिबिशेन सेंटर करायचं आहे. आणि यासाठी उद्या आरजी टू एक्झिबिशन सेंटर असा प्रस्ताव आलेला आहे. लहान मुलं-मुली खेळातात, मोफत खेळतात म्हणून त्याच्यावर डोळा आहे. हा आरजीचा प्लॉट कुठल्याही एनजीओकडे नाहीये. इथे अधिकृत एक असोसिएशन काम करतं. म्हणून हा आरजीचा प्लॉट त्यांना ढापायचा आहे. हे यातून स्पष्ट होतं, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

विषय क्रमांक चार, पुन्हा एकदा आरजी टू रिसिडेन्शियल म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड टू रिसिडेन्शियल हे डी वॉर्डमध्ये आहे. इथे लोढा आमदार आहेत आणि मंत्रीही आहेत. इथे एका उद्योगपतीचा बाजूला बंगला होता. तो बंगला पाडून दोन प्लॉट एकत्र करून मोठा टॉवर बांधायचा आहे की मोठा बंगला बांधायचा आहे हे माहिती नाही त्यांचा प्लॅन काय आहे. पण त्याचं अॅप्लिकेशन कोणी दिलेलं आहे, हे देखील माहिती काढा. मलबार हिल सारख्या ठिकाणी जिथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळचा प्लॉट आहे तिथे मोकळं मैदान काढून टॉवर बांधायचा आहे, विकायचा आहे की त्या उद्योगपतीला द्यायचा आहे? त्या उद्योगपतीचं नाव आम्ही घेत नाही, पण त्यांनी हा इशारा समजावा. पुढे आम्ही थेट घरावर मोर्चा काढू आणि तिथे एक सुद्धा विट बांधू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

मिंधेंना आणि भाजपच्या शासनाला रक्तपेढ्यांचे खासगीकरण करायचे आहे. दुसरं, मुंबईतले तीन महत्त्वाचे भूखंड जे आता रिक्रेएशन ग्राउंड आहेत म्हणजे मोकळी मैदानं आहेत. लहान मुला-मुलींपासून ते सगळे लोकं तिथे येऊन चालतात खेळतात योगा करतात, लाफ्टर क्लब आहेत. हे सगळं बंद करून एका उद्योजकाच्या हातात म्हणजे त्यांच्या बंगल्यासाठी आणि दुसरे दोन भूखंड रेसिडेन्शियलमध्ये करायचेत आहेत. हे नेमंक कोणासाठी होतंय? हा एक प्रश्न निर्माण होतोच. हा विषय आम्ही इथं सोडणार नाही. तसेच डी वॉर्डमधला प्लॉट एका उद्योजकाला दिला आहे, त्याच्यात कोण अधिकारी होतं? त्याने यात काय-काय केलेलं आहे? याची सगळी डिटेल्स आमच्याकडे आहेत. आणि हे प्रस्ताव रद्द झाले नाहीतर आम्ही उद्या पुन्हा प्रेससमोर येऊन त्या उद्योगपतीचं नाव, त्याच्यावर मोर्चा, कोण अधिकारी आहेत? हे कोर्टापर्यंतच नाही तर या प्रकरणी अॅक्शन होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

खासकरून जी मोकळी मैदानं आहेत रिक्रिएशन ग्राउंड असतील किंवा प्ले ग्राउंड असतील मुंबईतले भूखंड हे मुंबईकरांच्याच हतात असायला पाहिजेत. कारण अनेक अशी गोष्टी पाहतोय क्लस्टरमध्ये अभ्युदयनगरमधील ४८ मैदानं बदलू तिथे इमारती बांधणार आहेत. हे सगळे तुम्ही क्लस्टर करता आणि जेव्हा असे प्रस्ताव आणता तेव्हा मुंबईकरांना काय पाहिजे, तेच झालं पाहिजे. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर सरकारला काय पाहिजे, हे झालं नाही पाहिजे. आणि म्हणून जे सगळे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, इतर जे घटक पक्ष आहेत ते आणि भाजपला सुद्धा आग्रह करतोय की, उद्या तुम्ही याला विरोध करा जर तुमचा या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर. जर भाजपने मिंधे पाठिंबा दिला तर आम्ही समजून जाऊ की मिंधेंबरोबर तुम्हालापण ही मुंबई लुटायची आहे आणि ते उद्याच्या कारनाम्यातून स्पष्ट होणार आहे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

Comments are closed.