कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे. कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले असल्याने आज त्याठिकाणी नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक हे कणकवली तहसील कार्यालयात गेले असता त्याठिकाणी रांगेत नागरिकांची होणारी गैरसोय पाहून वैभव नाईक चांगलेच संतप्त झाले. गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक पावसकर यांना त्यांनी कडक शब्दांत याचा जाब विचारला. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जातो असे नागरिकांनी सांगताच त्यावर वैभव नाईक यांनी रांगेत असलेल्या सर्वांची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही, असा इशारा दिला.
प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांची एवढी मोठी रांग लागूनही कणकवलीचे तहसीलदार केबिन मध्ये बसून एसीची हवा घेत आहेत. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत असे त्यांना वाटत नाही. असे सांगत वैभव नाईक यांनी तहसीलदारांवर नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्रे व दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत थांबावे लागता कामा नये. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पावसकर यांना त्यांनी दिल्या. तुम्ही काय उपाययोजना केली हे पाहण्यासाठी मी पुन्हा ३ वाजता याठिकाणी येणार असल्याचेही वैभव नाईक यांनी सांगितले. वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळ पर्यंत पूर्ण करून देण्यात आले. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार मात्र शेवटपर्यंत गर्दीच्या ठिकाणी परतले नाहीत त्याबद्दल नागरिकांनीही तहसीलदारांवर रोष व्यक्त केला.
Comments are closed.