दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ, सत्ताधाऱ्यांकडून अटकेची मागणी
मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या मंत्र्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत करण्यात आली. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या (Disha Salian Case) वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांचा हत्याप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांनंतर भाजपच्या आमदारांनी अपेक्षेप्रमाणे आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करु, असे योगेश कदम यांनी म्हटले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उभे राहत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशाप्रकरणात ज्या संबंधित व्यक्तीवर आरोप होतो, त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करावी लागते. काल सतीश सालियन यांनी मविआच्या काळातील मंत्र्यावर आरोप केले. त्यामुळे त्या नेत्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे न्याय लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांच्या या मागणीला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी समर्थन दिले. नितेश राणे म्हणता त्याप्रकारे सामान्य माणसाला जो न्याय लागतो, तोच नियम माजी मंत्र्याला लावला पाहिजे. त्यामुळे मंत्रिमहोदयांनी आरोपीला तात्काळ अटक करुन चौकशी करावी, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले. त्यामुळे आता गृहखात्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर काही कठोर कारवाई होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अमित साटम यांची आदित्य ठाकरेंवर आगपाखड
दिशा सालियनच्या वडिलांनी आरोप केल्याप्रमाणे गँगरेप करुन दिशाचा खून करण्यात आला, असा त्यांना संशय आहे. मविआ सरकारच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यावेळी मुंबईच्या महापौर दिशाच्या आई-वडिलांना भेटल्या, त्यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांसमोर येण्यापासून रोखले, असे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर दडपण आणण्यात आले. त्यामुळे आपण या गोष्टी समोर आणू शकलो नाही, असे दिशाचे वडिलांचे म्हणणे आहे. पण दिशाच्या वडिलांना खात्री आहे की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. त्यावेळी शासनात मंत्री असलेल्या व्यक्तीचा यात सहभाग असल्याचा संशय दिशा सालियनच्या वडिलांना आहे, असे साटम यांनी म्हटले.
या मंत्र्यामुळे ही गोष्ट घडल्याचा संशय आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे. याठिकाणी देशभरातून अनेक तरुण-तरुणी करिअर घडवण्यासाठी येतात. कोणी पॉवरफुल व्यक्ती असेल किंवा कोणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहे, म्हणून अशी घटना दाबली जाणे चूक आहे. माझी शासनाला विनंती आहे की, डिसेंबर 2022 मध्ये जी एसआयटी नेमली होती, त्यांनी काय चौकशी केली, काय निष्कर्ष समोर आला? दिशा सालियनच्या वडिलांनी चार मित्र, तत्कालीन मंत्री आणि मुंबईच्या महापौरांचे नाव घेतले. एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे का? 8 जून 2020 रोजी एसआयटी नेमण्यात आली. ही चौकशी किती दिवसांत पूर्ण होणार, असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला.
https://www.youtube.com/watch?v=xi4wn38tvh8
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.