महापालिका शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव, खासगीकरणाच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्या प्रस्तावानुसार महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट करत पालिकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. भाजप सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिका आपल्या शाळांचे खासगीकरण करून त्या खासगी कंपन्यांना म्हणजेच बहुतेक बिल्डरांना सोपवण्याचा प्रस्ताव देते ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘गेल्या दोन दशकांत शिवसेनेने अथक मेहनत घेऊन महानगरपालिका शाळांचा कायापालट केला. अद्ययावत पायाभूत सुविधांनी त्या सुसज्ज करून त्यात अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर उपक्रम सुरू केले. एसएससीबरोबरच सीबीएसई, आयबी, आयजीएससीई आणि आयसीएसई या बोर्डांचे शिक्षण मोफत देणारी मुंबई महापालिका ही जगातील एकमेव पालिका ठरली. सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण आणि लिंग समानता, खगोलशास्त्र क्लब, निसर्ग क्लब यांसारखे उपक्रमही उपलब्ध करून दिले. आता पालिकेत सत्तेवर येताच भाजप त्या शाळांचे खासगीकरण करू पाहत आहे,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

खासगी संस्थांनी कब्जा केलेल्या महानगरपालिका शाळांचा शोध घ्या. तसेच बिल्डरांनी जे शाळांचे भूखंड पालिकेला परत केलेले नाहीत ते ताब्यात घ्या. जेणेकरून तिथे सर्वांसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण सुरू ठेवता येईल.

Comments are closed.