आमिर खान 5 जुलैला तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, शेअर केली तिसऱ्या लग्नाची बातमी
बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 61 वर्षीय अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला असून, त्याची साथीदार गौरी स्प्रॅट हिच्यासोबत तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी आमिरने गौरीसोबतच्या नात्याची सार्वजनिक कबुली दिली होती. त्यानंतर दोघे एकत्र दिसू लागले आणि त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. आता जुलै महिन्यात एका खासगी समारंभात दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. आमिरनेच या बातमीला दुजोरा दिलेला असून, त्याने नुकतेच गर्लफ्रेंड गौरीसोबत बोहोल्यावर चढणार असल्याचं सांगितलं आहे.
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ता आणि डिसेंबर 2005 मध्ये किरण राव यांच्याशी लग्न केले होते. 2021 मध्ये किरणपासून घटस्फोट घेतल्यानंतर पाच वर्षांनी तो तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. आमिर खानने यावर्षी मार्चमध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त 47 वर्षीय गौरी स्प्रॅटसोबतच्या आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते. आता लग्नाची पुष्टी करताना तो म्हणाला, “मी सध्या अमेरिकेत आहे, लग्नाची बातमी खरी आहे. हे लग्न 5 जुलैला होणार आहे.”
आमिर आणि गौरी यांची ओळख अनेक वर्षांपूर्वी झाली होती. कालांतराने त्यांची मैत्री अधिक दृढ झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यावर्षी मार्चमध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त आमिरने माध्यमांसमोर गौरीची ओळख करून देत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळुरूची असून व्यवसाय आणि फॅशन क्षेत्राशी संबंधित आहे. ती प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा खाजगी आयुष्याला प्राधान्य देते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती फारच कमी असते. सध्या ती आमिरच्या काही व्यावसायिक उपक्रमांशीही जोडली गेल्याचे सांगितले जाते. असे वृत्त एबीपीने दिले आहे. आमिरच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments are closed.