SRH vs DC: अभिषेक शर्माची वादळी खेळी; रोहितला मागे टाकत विराटच्या महाविक्रमाशी केली बरोबरी!

आयपीएल 2026 च्या 31 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH vs DC) सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, त्याने हे शतक अवघ्या 47 चेंडूत पूर्ण केले. अभिषेक शर्माने या खेळीसह टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित शर्माला मागे सोडले आहे. तर दुसरीकडे, टी-20 फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके लावण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) महाविक्रमाची बरोबरी केली आहे.

अभिषेकच्या टी-20 कारकिर्दीतील हे 9 वे शतक आहे. विराटनेही टी-20 मध्ये 9 शतके झळकावली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) 8 शतके ठोकली आहेत. मात्र, या सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावून त्याला मागे टाकले आहे. अभिषेक शर्माचा हाच फॉर्म कायम राहिला, तर तो या आयपीएल हंगामात अजून एक शतक झळकावून टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा भारतीय फलंदाज बनू शकतो. अभिषेकने आपल्या शतकी खेळीदरम्यान 10 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. या खेळीत अभिषेक शर्माची सुरुवात संथ झाली होती, पण क्रीजवर सेट झाल्यानंतर त्याने धावांचा जोरदार पाऊस पाडला. अभिषेक शर्मा या सामन्यात 10 पेक्षा जास्त षटकार मारण्यात यशस्वी ठरला.

टी-20 क्रिकेटमध्ये ही पाचवी वेळ आहे जेव्हा अभिषेक शर्माच्या बॅटमधून एका डावात 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार आले आहेत. या यादीत अव्वल स्थानी ख्रिस गेलचे नाव आहे. गेलने 18 टी-20 डावांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. अभिषेकने आयपीएलच्या एका डावात 10 षटकार मारण्याची ही दुसरी वेळ आहे. गेलनंतर असा कारनामा एकापेक्षा जास्त वेळा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. गेलने आयपीएलमध्ये चार डावांत 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत.

Comments are closed.