अभिषेकचं शतक अन् मलिंगाच्या जादूने काव्या मारनच्या हैदराबादचं दिवस बदलले, पॉइंट्स टेबलमध्ये उलथ

सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 31 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 47 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात हैदराबादने सरस कामगिरी केली. अभिषेक शर्माने तुफानी फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 2 गडी गमावत तब्बल 242 धावांचा डोंगर उभारला. पण, दिल्लीचा संघ 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारू शकला. सनराइजर्स हैदराबादने याविजयसह मौल्यवान दोन गुण आपल्या खात्यात जमा केले. या विजयासह हैदराबादने पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून प्लेऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

अभिषेकचा तुफानी शतक

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी पहिल्याच षटकांपासून दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पॉवरप्ले संपेपर्यंत हैदराबादचा स्कोअर 6 षटकांत 67 धावा असा भक्कम झाला होता. नवव्या षटकात अभिषेक शर्माने केवळ 25 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याच षटकात हैदराबादला पहिला धक्का बसला, जेव्हा ट्रॅव्हिस हेड 37 धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

हेड बाद झाल्यानंतरही अभिषेक शर्माचा आक्रमक खेळ कायम राहिला. त्याने फक्त 47 चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले. यानंतरही अभिषेक थांबला नाही. त्याने अखेर 68 चेंडूंमध्ये नाबाद 135 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 10 षटकार मारले. अभिषेक शर्माच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर सनराइजर्स हैदराबादने 2 गडी गमावून 242 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून अक्षर पटेलने एक बळी घेतला.

दिल्लीची धक्कादायक सुरुवात

243 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात मात्र खराब झाली. पथुम निसांकाने 8 चेंडूत 8 धावा करून स्वस्तात माघारी परतल्यानंतर, के.एल. राहुल (37 धावा) आणि नितीश राणा यांनी डावाला आकार दिला. नितीश राणाने 30 चेंडूत 7 चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने 57 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे दिल्लीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, मलिंगाने आपल्या भेदक गोलंदाजीने दिल्लीच्या मध्यफळीचे कंबरडे मोडले. त्याने घातक फलंदाज डेव्हिड मिलरला शून्यावर बाद केले आणि त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला (27 धावा) बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. त्यानंतर दिल्ली सावरली नाही आणि 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 195 धावाच करता आल्या. हैदराबादकडून इशान मलिंगाने चार, तर हर्ष दुबेने तीन बळी घेतले. शकिब हुसेन आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयामुळे हैदराबाद आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

आणखी वाचा

Comments are closed.