कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या

भंडारा : गरीब कामगाराच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्र परत करण्यासाठी 11 हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या ‘नेहा सेतू केंद्रा’च्या संचालकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. शासकीय कामासाठी लागणारी मूळ कागदपत्रे चक्क ओलीस ठेवून पैशांची मागणी करणाऱ्या या सेतू केंद्र चालकावर कारवाई झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासन आणि इतर सेतू सुविधा केंद्रांच्या (Bhandara) कार्यक्षमतेवरही या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, सेतू सुविधा केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या फसवणूक आणि लुटीबाबत अनेकदा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो.

सतीश मोटघरे असं सेतू केंद्र चालकाचं नावं असून भंडाऱ्याच्या लाखनी येथील सिंधी लाईन चौकात असलेल्या ‘नेहा सेतू केंद्रा’वर एसीबीने ही कारवाई केली. तक्रारदार हे एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असून त्यांनी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी या सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यावेळी संचालक सतीश मोटघरे याने विद्यार्थ्यांची दहावीची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड अशी महत्त्वाची मूळ कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारदार आपली कागदपत्र परत मागण्यासाठी चकरा मारत होते, मात्र मोटघरे काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता. अखेर 30 जानेवारी रोजी त्यानं ही कागदपत्र परत करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाखाली आणि स्वतःसाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर तक्रारदाराकडून 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सतीश मोटघरे याला एसीबीच्या पथकानं पंचासमक्ष रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

दरम्यान, या लाचप्रकरणामुळे शालेय शिक्षण व्यवस्था आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेकदा सर्वसामान्य पालकांना, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते. पैशांची अमाप मागणी करत विद्यार्थ्यांची लूट करण्यात येते. त्यामुळे, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी सेतू सुविधा केंद्र आणि महसूल विभागावर याबाबत कडक जरब ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला

आणखी वाचा

Comments are closed.