95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ

धाराशिव : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एएसीबी) विभागाच्या कारवाईने जोर धरला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत. विशेषत: महसूल खात्यात तहसिलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आता, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत (bribe) प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव (Dharashiv) ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातही लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाठ्याला रंगेहात अटक केली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तलाठी रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे असून यातील तलाठी रावसाहेब काकडे याची सेवानिवृत्ती अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पोलिसांनी रंगेहात धाड टाकत तलाठी महोदयांना अटक केली असून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे महाशय वंचित राहू शकतात.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.