चकमकीत ठार झालेल्या मुलावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप
चार दिवसांपासून होता फरार : पश्चिम बंगालमधील घटना
उत्तर दिनाजपूर : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिह्यात 12 वषीय भाचीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला दिलीप रॉय सोमवारी पहाटे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. रायगंज येथील परापुकूर गावात त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला होता. या वेळी आरोपीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी पोलिसांच्या वाहनाच्या टायरला लागली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दिलीप जखमी झाला. त्याला ऊग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी चार दिवसांपासून फरार होता. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास बिहार सीमेजवळ तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर परापुकूर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. झारखंडचा रहिवासी असलेला दिलीप बिहारमार्गे पश्चिम बंगालमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
3 नोव्हेंबरपासून मुलगी बेपत्ता
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी मुलगी सायकल घेऊन घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती परत न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. 5 नोव्हेंबर रोजी कुलिक नदीजवळील जंगलात तिचा मृतदेह आढळला. तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप रॉय हा मुलीचा नातेवाईक होता. नदी दाखविण्याच्या बहाण्याने त्याने तिला जंगलात नेल्याचा संशय आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
राज्यातील चौथी चकमक
पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पोलिस चकमकीत आरोपीचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना असल्याचे वृत्त आहे. राज्याचे मंत्री दिलीप घोष यांनी, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांचा सामना करावा लागेल, अशी प्रतिक्रिया दिली.
Comments are closed.