जंतरमंतर आंदोलन प्रकरणी कारवाई सुरू.

कलम 163 च्या उल्लंघनामुळे संबंधितांवर एफआयआर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जंतरमंतर येथे शुक्रवारी झालेल्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी तीन एफआयआर दाखल केले आहेत. हे एफआयआर पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल दाखल करण्यात आले आहेत. एफआयआरमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेची नावे नाहीत, परंतु आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या आणि त्यात सहभागी झालेल्या आयोजकांचा आणि संघटनांचा उल्लेख आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे भारतीय दंड संहितेचे कलम 163 लागू केले होते. असे असूनही, जंतरमंतर येथे पोहोचण्याच्या प्रयत्नांदरम्यान पोलिसांशी झटापटी झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारच्या आंदोलनाशी संबंधित एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेची अतिरिक्त कलमे किंवा इतर संबंधित कायदे लागू करण्यात आले आहेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन नवी दिल्लीत आंदोलन केल्यामुळे त्या कायद्यांचे उल्लंघन केल्याने सदर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेचे कलम 163 संपूर्ण मध्य दिल्लीत आधीपासूनच लागू होते.

तीन एफआयआर दाखल

विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि नागरी समाज कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केलेल्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी किमान तीन गुन्हे दाखल केले आहेत. मतदारयादीच्या ‘एसआयआर’मधील कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ते जंतरमंतर येथे जमणार होते, परंतु पोलीस आणि सुरक्षा दलांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. पोलीस अधिकाऱ्यांच्या दैनंदिन डायरीतील नोंदींच्या आधारे, पार्लमेंट स्ट्रीट आणि कनॉट प्लेस या दोन पोलीस ठाण्यांमध्ये तीन एफआयआर दाखल करण्यात आले.

Comments are closed.