ठाण्याची स्मार्ट सिटी ‘खड्ड्या’त; भर उन्हात माता-भगिनींवर डबक्यातून पाणी आणण्याची वेळ
उखडलेले रस्ते, अस्ताव्यस्त सुरू असलेली बेकायदा बांधकामे, तासन्तास होणारी वाहतूककोंडी यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले असतानाच महापालिका प्रशासनाने गाजावाजा केलेली ‘स्मार्ट सिटी’ कशी ‘खड्ड्या’त गेली आहे याचे आणखी एक भीषण वास्तव समोर आले आहे.
एकीकडे घोडबंदरवर पंचतारांकित ‘टॉवर्स’च्या नळातून धो धो पाणी वाहत असताना या चकाचक वस्तीला लागून असलेल्या पाचवड पाडा, साग पाडा, उंबरबावडी पाडा येथील गावकऱ्यांची मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात निघालेल्या या गावातील महिलांना डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. आमचे हे हाल कधी संपणार, असा आर्त सवाल येथील गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
नव्याने विकसित होत असलेल्या घोडबंदर पट्ट्यात टोलेजंग इमारती उभ्या राहात असून कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स विकले जात आहेत. तरण तलाव, मोठमोठी हॉटेल्स व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मुबलक पाणी आहे. एकीकडे श्रीमंती थाटाचे प्रदर्शन तर दुसरीकडे याच घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांमध्ये गरिबीचे चटके भूमिपुत्रांना सहन करावे लागत आहेत. वडवली पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर पाचवड पाडा, सागपाडा व उंबरबावडी पाडा असे तीन आदिवासी पाडे आहेत. सुमारे 700 लोकवस्ती असून येथील रहिवासी हे भूमिपुत्र आहेत. या पाड्यापासून जवळच ज्ञानगंगा कॉलेज व हावरे सिटीचा परिसर आहे. तेथे मुबलक पाणी असताना आदिवासी पाडय़ात मात्र पिण्यासाठी पाणीही मिळत नाही अशी भयाण स्थिती आहे.
…तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू
घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे बांधव हे भूमिपुत्र आहेत. स्वातंत्र्याला 78 वर्षे उलटली तरीही अजून आम्ही पारतंत्र्यातच आहोत. सध्या उन्हाचे चटके बसत असताना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. घरात कपडे धुवायलादेखील पाणी नाही. लवकरात लवकर ठाणे महापालिकेने नवी जलवाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा येथील आदिवासी बांधव वसंत गावीत यांनी दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेने सात वर्षांपूर्वी घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये जलवाहिनी टाकली होती. पम्पिंगद्वारे रहिवाशांना पाणी मिळत होते. सकाळी 20 मिनिटे का होईना नळाला पाणी यायचे.
आता नळाला टिपूसही येत नाही. त्यामुळे नाईलाजाने पाचवड पाडा येथील ओढ्याच्या खड्ड्यांमधील दूषित पाणी आणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
पाड्यांमधील सुमारे 60 मुले व मुली वसंत विहार येथील शाळेत जातात. मात्र अनेकदा शाळेला दांडी मारून त्यांना खड्ड्यातील पाणी आणावे लागते.
Comments are closed.