केंद्राच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळं कोणत्याच शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत… रोहित पवारांची टीका
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजासह तीन जहाजांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. यातील दोन जहाजे जप्त करून इराणच्या दिशेने ओढून नेण्यात आली असून त्यात हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला मोठा फटका बसला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया हँडलवरून केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांना लक्ष्य केले आहे. ‘गेल्या दहा-बारा वर्षांपासून देश अमेरिकेच्या बाजूने झुकत चालला असून त्याचा फायदा तर सोडाच पण देशाला कायम तोटा आणि एकावर एक फ्री याप्रमाणे तोट्यासोबतच मानहानीही सहन करावी लागतेय’, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळं इराणचं तर सोडूनच द्या पण आज रोजी हिंदुस्थानचे कोणत्याच शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत आणि ही बाब देशासाठी चांगली नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘हिंदुस्थानचा मित्रदेश म्हणून ज्यांची कायम ओळख आहे आणि ज्या देशांसोबत हिंदुस्थानचे प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत त्या इराणने हिंदुस्थानी जहाजावर गोळीबार करणं असो किंवा आता हिंदुस्थानकडे निघालेली दोन जहाजे ताब्यात घेण्याचा विषय असो, हे हिंदुस्थानच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणाचं लक्षण आहे. स्वातंत्र्यापासून हिंदुस्थानने कायम अलिप्ततावादाचा स्वीकार केला, पण गेल्या दहा-बारा वर्षांपासून देश अमेरिकेच्या बाजूने झुकत चालला असून त्याचा फायदा तर सोडाच पण देशाला कायम तोटा आणि एकावर एक फ्री याप्रमाणे तोट्यासोबतच मानहानीही सहन करावी लागतेय. यामुळं गॅस तुटवड्यासारख्या अनेक अडचणी सामान्य माणसाला सहन कराव्या लागतायेत.
अक्कलशून्य ‘भक्त संप्रदायाला’ केंद्राचा कोणताही निर्णय हा त्यांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’ वाटतो… पण आता इराणने ताब्यात घेतलेल्या हिंदुस्थानच्या दोन जहाजांच्या निर्णयालाही ही ‘भक्त मंडळी’ मास्टर स्ट्रोक म्हणतील.. त्यांचं बाजूला ठेवू पण केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळं इराणचं तर सोडूनच द्या पण आज रोजी हिंदुस्थानचे कोणत्याच शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत आणि ही बाब देशासाठी चांगली नाही, हे मान्य करावंच लागेल’.
Comments are closed.