तोट्यातल्या एसटीसाठी धावली मराठमोळी जोडी, रितेश-जेनेलिया लालपरीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मदतीला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मराठमोळे कलावंत दांपत्य धावून आले आहे. रितेश आणि जेनेलिया यांना एसटीचे सदिच्छादूत (ब्रॅण्ड अॅम्बेसेडर) बनवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे ही जोडी लालपरीच्या सुरक्षित प्रवासाबाबत व नवनवीन उपक्रमांबाबत जनजागृती करणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रितेश देशमुख यांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवल्याचा करारनामा सोपवला. निरपेक्ष भावनेने, महाराष्ट्रावरील प्रेमापोटी आणि दिवंगत पिता विलासराव देशमुख यांच्या आठवणी एसटीशी जोडल्या असल्याने आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे रितेशने सांगितले.

रितेशने यावेळी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाला. ‘आपल्या वडिलांनीही परिवहन खाते सांभाळले होते. ते एसटीतून प्रवास करायचे. त्यांच्यासोबत मीसुद्धा एसटीने फिरायचो. कंडक्टर दोरी कसे ओढतात, तिकिटासाठी पैसे कसे द्यायचे हे सर्व ते मला सांगायचे. बेळगावमध्ये आजही त्यांचा एक एसटीमध्ये बसल्याचा फोटो आहे, जो बाहेरून काढलेला आहे. खिडकीजवळची सीट त्यांना आवडायची. तिथे बसले की छान वारा लागतो आणि मस्त झोप येते असे ते म्हणायचे. लालपरी माझ्या आयुष्याचा एक भाग होती. त्या एसटीचा मी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झालो ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ असे रितेश देशमुख म्हणाला.

एसटीने प्रवास करणार का असे पत्रकारांनी विचारले असता रितेशने, आपण दोघे मिळून प्रवास करू असे सांगितले. जेनेलियाबरोबर एसटीने फिरणार का असे विचारताच, निश्चितच आम्ही दोघे एसटीने प्रवास करू असे त्याने सांगितले.

मराठी भाषा सक्तीचा निर्णय योग्यच

येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. यावरून सुरू असलेल्या वादावर रितेशने आपले मत मांडले. तो म्हणाला ‘महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अनिवार्य असलीच पाहिजे. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य बोलली पाहिजे, त्याचप्रकारे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे.’

Comments are closed.