अदानीच्या तारळी प्रकल्पालाही दणका; प्रदूषण मंडळाने काम रोखले!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सह्याद्री पर्वताचे लचके तोडणाऱ्या अदानी समूहाच्या तारळी धरणावरील प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश वन विभागाच्या पाठोपाठ आता प्रदूषण नियंत्रण मंडळानेही दिल्यामुळे अदानी समूहाला दुसरा दणका बसला आहे. दरम्यान, सर्व यंत्रणांना फाटय़ावर मारून प्रकल्पाचे काम रेटणाऱ्या अदानी समूहाने नरमाईची भूमिका घेत आज दुपारी प्रकल्पाचे काम थांबवले आहे.

सातारा जिह्यातील तारळी धरणावर अदानी समूहाकडून राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून आवश्यक असलेल्या कोणत्याही परवानग्या न घेता तारळी पंप स्टोरेज प्रकल्प या नावाने 1500 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम बेधडकपणे सुरू होते. या कामासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगातील जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध आणि पर्यावरणीय दृष्टय़ा संवेदनशील विभागात अजस्त्र यंत्रसामग्रीच्या सहाय्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात होते. त्याचप्रमाणे हजारो झाडांची निर्दयपणे कत्तल सुरू होती. याप्रकरणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी या प्रकल्पातील अनियमितता आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. त्याचप्रमाणे याबद्दल जनतेतून मोठा आवाज उठल्यानंतर वनविभागाने कोणत्याही परवानग्या न घेता प्रकल्प रेटल्याचा ठपका ठेवत प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे कोणालाही न जुमानता प्रकल्पाचे काम सुरूच असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रकल्पातील सर्व उत्खनन आणि बांधकामे तात्काळ बंद करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. रोहन भाटे यांच्या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पाटण तालुक्यातील सावरघर येथील गट क्रमांक 33 आणि 34 ची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीत कोणतीही पर्यावरणीय मंजुरी किंवा आवश्यक संमती नसताना येथे बेधडक उत्खनन आणि विकासकामे सुरू असल्याचे उघड झाले. याची गंभीर दखल घेत मंडळाने सध्या सुरू असलेली तसेच प्रस्तावित कामे तातडीने थांबवण्याचे फर्मान सोडले आहे. मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे अदानीच्या या प्रकल्पाला दुहेरी दणका बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार सावरघर येथील गट नं 33 आणि 34 साठी सातारा जिल्हाधिकाऱयांनी 6 मार्च 2026 रोजी जाहीर नोटीस काढली आणि 10 एप्रिल 2026 रोजी याची जनसुनावणी निश्चित केली होती. या जनसुनावणीत, सावरघर हे गाव या प्रकल्पाचा भाग नाही आणि सावरघर हे गाव प्रकल्पातून वगळण्यासंदर्भातील मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातारा कार्यालयाने यासंदर्भात वेळोवेळी हात वर केल्यावर, पर्यावरण मंत्रालयाशी सतत संपर्क केल्यावर तसेच माहितीच्या अधिकाराचा वापर केल्यावर 9 जून 2026 रोजी प्रादेशिक कार्यालयाने सातारा कार्यालयास पत्र दिले. त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना याप्रकरणी प्रचंड पाठपुरावा करावा लागला परंतु ऑक्टोबर 2026 पर्यंत या विषयावर कोणतीही कारवाई झाली नाही.

…तर हजारो झाडे वाचली असती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे संबंधित अधिकारी यांनी वेळीच चौकशी केली असती आणि आपले कर्तव्य पार पडले असते तर आज हजारो झाडे जंगल वनस्पती वाचल्या असत्या, शेकडो पशुपक्ष्यांचे घर उजाडले नसते अशा वेदना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सर्व प्रशासन अदानीसमोर मूग गिळून गप्प बसले होते, की यांचे लागेबांधे होते याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.

काम थांबले

वन विभागापाठोपाठ प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कारवाईचे अस्त्र उगारले असल्यामुळे आणि मोठय़ा प्रमाणावर जनतेचा उठाव झाल्यामुळे सुसाट सुटलेल्या अदानी समूहाने काहीशी नरमाईची भूमिका घेतली. आज दुपारी साडेतीनपर्यंत प्रकल्पाचे संपूर्ण काम ठप्प झाल्याचे दिसून आले.

Comments are closed.