अवतीभवती – अंबवडे बनतेय किल्ल्यांचे गाव
>> एम. n. पवार
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या अंबवडे बुद्रुक या गावात दिवाळीच्या आधी किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. सातारा शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर आणि सज्जनगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे किल्ले बनवण्याची स्पर्धा व प्रदर्शन भरवले जाते, ज्यामुळे शिवकालीन गड-किल्ल्यांचा इतिहास जपला जातो. दिवाळीच्या काळात गावातील लहान मुले आणि ग्रामस्थ एकत्र येऊन दगड, माती आणि शेणापासून गड-किल्ल्यांच्या डझनभर प्रतिकृती उभारतात.
हा उपक्रम 2012 पासून सुरू आहे. या वर्षी किल्ल्याचे गाव असलेल्या अंबवडे बुद्रुक येथे इतिहासाची साक्ष देणारे सुमारे 40 किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. तसेच यावर्षी शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
अंबवडे या गावी गेल्या 12 वर्षांपासून गुंठाभर जागेत किंवा शेतात भव्य असे किल्ले उभारण्यास सुरुवात करण्यात आली. एका ठिकाणी लिंगाणा, हरिहरगड, रांगणा, पिसोळ, रोहिडा, पट्टा किल्ला, राजगड, सिंहगड, सुधागड, अवचितगड, पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड, राजमाचीचे मनरंजन व श्रीवर्धनगड, तोरणा, अजिंक्यतारा, वर्धनगड, पारगड, प्रतापगड, पद्मदुर्ग, शिवनेरी, वैराटगड किल्ले उभारले होते. केवळ किल्ले न उभारता सोबत या प्रत्येक किल्ल्याचा इतिहासही फलकांवर मांडण्यात आला होता. यामुळे इतिहासप्रेमींना मराठी साम्राज्यातील एक ऐवज अनुभवता आला. या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबत माहिती प्राप्त करता आली. या काळात इथे काही बालनाटिका सादर करण्यात आल्या. बालनाटिकेमधून पावनखिंडचा थरारक अनुभव, सिंहगडावरच्या लढाईचा थरार अनुभवता येणारे प्रसंग सादर करण्यात आले. याची बालमावळ्यांनी नाटिकासुद्धा बसवली. तसेच खास शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
किल्ला बनवण्यासाठी बालमावळ्यांनी कमीत कमी खर्च करून तटबंदी बनवण्यासाठी माती, शेण, राख, भुसा याचा वापर केला. तर सैनिक, घर, मंदिरे पुठ्ठय़ांची बनवली होती. डोंगरी किल्ल्यांबरोबरच सागरी किल्लेदेखील हुबेहूब साकारले. तसेच किल्ल्यांच्या देखाव्याबरोबरच त्या किल्ल्याची माहिती व इतिहास याचे सादरीकरण बालमावळ्यांनी केले. अशा अनोख्या उपक्रमाला दरवर्षी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
Comments are closed.