संस्कृतायन  – कालिदासाचा रावण आणि शूर्पणखा

>> डॉ समीरा गुजर जोशी

आपल्या साहित्यपरंपरेत ‘रामादिवद्वर्तितव्यं न रावणादिवत्’ असा आदर्श सांगितला आहे. कालिदास या परंपरेचा पाईक आहे. रावणाचे सामर्थ्य तो मान्य करतो, पण त्याचे उदात्तीकरण करत नाही. शूर्पणखेचे आकर्षण आणि अपमानातून निर्माण झालेला संतापही तो रंगवतो, पण तिचे आक्रमक वर्तन नजरेआड करत नाही.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या निमित्ताने रावण आणि शूर्पणखा या व्यक्तिरेखा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विशेषत रावणाच्या पूर्वकथेला दिलेले महत्त्व आणि शूर्पणखेच्या प्रसंगाचे वेगळे चित्रण यांविषयी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाकवी कालिदासाने या दोन व्यक्तिरेखा कशा रंगवल्या आहेत, हे पाहणे उद्बोधक ठरेल.
वाल्मीकींचे ‘रामायण’ हे रामचरित्राला वाहिलेले महाकाव्य आहे, तर कालिदासाच्या ‘रघुवंशा’चा विषय संपूर्ण रघुवंशाचा इतिहास आहे. दिलीप, रघू, अज, दशरथ, राम आणि त्यानंतरचे राजे असा या महाकाव्याचा विस्तृत पट आहे. त्यामुळे रामकथा हा रघुवंशातील एक भाग असून कालिदासाने ती तुलनेने संक्षेपाने मांडली आहे. मात्र या संक्षिप्त आवृत्तीतही त्याच्या उपमा, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य प्रकर्षाने जाणवते. रघुवंशाच्या दहाव्या सर्गात रावणाच्या अत्याचारांनी त्रस्त झालेले देव विष्णूकडे जातात. कालिदास म्हणतो,

त्या प्रसंगी देवांनी पौलस्त्याजवळ जाऊन हरीची पूजा केली
उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत प्रवास करणाऱ्यांप्रमाणे ते त्याच्याजवळ गेले

उन्हाने व्याकूळ झालेले प्रवासी जसे सावली देणाऱया वृक्षाचा आश्रय घेतात, तसे रावणाच्या अत्याचारांनी त्रस्त देव विष्णूला शरण जातात. या एका उपमेतून रावणाने निर्माण केलेली दहशत आणि विष्णूच्या आश्रयाचे महत्त्व स्पष्ट होते.
रावणाचे अत्याचारही कालिदास स्पष्टपणे सांगतो. मायावी राक्षस यज्ञातील हविर्भाग हिरावून घेत होते. रावणाचे पुष्पक विमान दिसताच आकाशमार्गाने प्रवास करणारे पुण्यात्मे आपली विमाने मेघांआड लपवत होते. स्वर्गीय स्त्रियांना केसांना धरून ओढण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. अर्थात, कालिदास रावणाचे सामर्थ्य नाकारत नाही. लोकपालांना जिंकणारा, कैलास पर्वत उचलणारा आणि स्वतच्या मस्तकांनी शंकराची आराधना करणारा असा त्याचा उल्लेख येतो. परंतु हे गुण सांगताना रावणाचे दुष्कृत्य झाकले जात नाही. त्याचा पराक्रम मोठा असला तरी तो अधर्माच्या मार्गाने जाणारा खलनायक आहे, याचे भान कालिदास राखतो. बाराव्या सर्गात शूर्पणखेचे चित्रण अधिकच प्रत्ययकारी आहे.

तेथे रावणाची धाकटी बहीण रामावर उत्कटतेने मात झाली
उन्हाळ्याने हैराण होऊन तो सापासारखा मलायन वृक्षाजवळ गेला

रावणाची धाकटी बहीण शूर्पणखा कामविव्हल होऊन रामाकडे येते. उन्हाने व्याकूळ झालेली नागीण चंदनवृक्षाकडे यावी, तशी ती रामाकडे आकर्षित होते. चंदनाची शीतलता आणि नागिणीची अस्वस्थता यांमधून कालिदासाने दोघांच्या प्रकृतीतील विरोध सूचित केला आहे.

सीतेच्या उपस्थितीतच शूर्पणखा रामाला विवाहाची मागणी घालते. राम तिला लक्ष्मणाकडे पाठवतो. तिथेही नकार मिळाल्याने ती पुन्हा रामाकडे वळते. दोन्ही किनाऱयांमध्ये हेलकावे खाणाऱया नदीप्रमाणे तिची अवस्था होते. सीतेच्या हास्यामुळे तिचा संताप उफाळून येतो. शांत समुद्रात चंद्रोदयामुळे भरती यावी, अशी कालिदासाची उपमा आहे. इथे महाभारतातील मयसभेत दुर्योधनाची झालेली फजिती आठवते. त्या प्रसंगाशी द्रौपदीचे हास्य जोडणारी लोकप्रिय परंपरा आहे. मात्र मूळ महाभारतातील वर्णन त्याहून वेगळे आहे. दोन्ही कथांच्या संदर्भात एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. हास्य हे निमित्त ठरते, अनर्थाचे मूळ असते ते दुखावलेल्या अहंकारात आणि त्यातून जन्माला येणाऱ्या सूडभावनेत!

शूर्पणखा पुढे सीतेला धमकावते. त्यानंतर लक्ष्मण तिचे नाक-कान कापतो. तिच्या अपमानाची आणि खर-दूषणादी आप्तांच्या वधाची बातमी रावणापर्यंत पोहोचते. रामाने जणू आपल्या दहाही मस्तकांवर पाय ठेवला, असे रावणाला वाटते! शूर्पणखेच्या संतापापासून रावणाच्या सूडभावनेपर्यंत दुखावलेल्या अहंकाराचेच सूत्र दिसते. या व्यक्तिचित्रणातून कालिदासाच्या काव्यदृष्टीचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ लक्षात येते. आपल्या साहित्यपरंपरेत ‘रामादिवद्वर्तितव्यं न रावणादिवत्’ असा आदर्श सांगितला आहे. म्हणजे रामाप्रमाणे आचरण करावे, रावणाप्रमाणे नव्हे. हा बोध व्हायचा असेल तर खलनायकाचे सामर्थ्य आणि त्याचे दोष या दोन्हींचे यथार्थ चित्रण आवश्यक आहे. रावणाच्या गुणांचे वर्णन करताना त्याच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष झाले, तर व्यक्तिचित्रणाचा नैतिक तोल ढळू शकतो. कालिदास या परंपरेचा पाईक आहे. रावणाचे सामर्थ्य तो मान्य करतो, पण त्याचे उदात्तीकरण करत नाही. शूर्पणखेच्या मनातील आकर्षण आणि अपमानातून निर्माण झालेला संतापही तो रंगवतो, पण तिचे आक्रमक वर्तन नजरेआड करत नाही.

कुशल चित्रकार काही मोजक्या रेषांतून एखादे प्रत्ययकारी व्यक्तिचित्र उभे करतो, तसेच कालिदास मोजक्या श्लोकांतून या दोन्ही व्यक्तिरेखा साकारतो. त्यांना अनावश्यक विस्तार देत नाही आणि त्यांच्यातील खलप्रवृत्तीही झाकत नाही. ही संयमित, परिणामकारक आणि मूल्यभान जपणारी चित्रणशैली हेच कालिदासाच्या काव्यप्रतिभेचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.) [email protected]

Comments are closed.