रोखठोक – रोज एक नवी नौटंकी!

भाजप व पंतप्रधान मोदी रोज रोज `नौटंकी’ करून थकत कसे नाहीत याचे आश्चर्यच वाटते. दिल्लीतील केजरीवाल वापरत असलेले मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पर्यटकांना तिकीट लावून दाखवण्यात येणार आहे. तिकडे `मनिला’ येथील जागतिक संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी मंचावर केलेली `नौटंकी’ हास्यास्पद ठरली. या लोकांचे हे रोजचेच खेळ आहेत. जगात त्यांचे हसे होत आहे.

भारतीय जनता पक्ष (सध्याचा) एक महान नौटंकीबाज पक्ष बनला आहे. त्याचे चालणे, रडणे, हसणे, खोकणे, बोलणे या सगळ्यातच नौटंकी असते. पंतप्रधान मोदी `नौटंकी’ करून थकत कसे नाहीत? हा प्रश्न अनेकदा पडतो. फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे एका जागतिक संमेलनासाठी मोदी गेले. प्रे. ट्रम्पसह सर्व नेत्यांना मंचावर आमंत्रित केले. मोदी मंचावर आले व मंचावरचा कचरा उचलावा तसे काहीतरी उचलून खिशात ठेवले. सर्व नेते त्यांची मजा घेत होते. इथे भारतात भक्तांनी हवा पसरवली, `मंचावर भारताचा तिरंगा असलेले लेबल पडले होते. अपमान होऊ नये म्हणून मोदींनी ते उचलून खिशात ठेवले.’ मुळात हे खोटे आहे. कोणी कोठे उभे राहायचे यासाठी ठेवलेली म्हणजे चिकटवलेली ती खूण असते. मोदींनी ती खूण फाडून खिशात ठेवली. याआधी जेथे जेथे अशा संमेलनास मोदी गेले, त्या प्रत्येक मंचावर अशा खुणा होत्या. तेव्हा मोदींना त्यातला तिरंगा दिसला नाही, पण नौटंकीच करायची म्हटल्यावर मोदींना कोण रोखणार? उद्या दिल्लीत सत्ताबदल झाला तर या सगळ्या नौटंकीबाज लोकांना किमान 14 वर्षांच्या वनवासात पाठवायला हवे. सध्या मी दिल्लीत आहे. दिल्लीची हवा थंड झाली आहे. 18 नोव्हेंबरच्या दिल्लीतील वृत्तपत्रात एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा बंगला पर्यटकांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री असताना केजरीवाल हे 6, सिव्हिल लाईन्सवरील सरकारी बंगल्यात राहत होते. लोकांनी त्यांना तीन वेळा निवडून दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या सजावटीवर काही कोटी खर्च केले व हा एक प्रकारे काचमहाल असल्याचा प्रचार भाजपने निवडणुकीत केला. मुख्यमंत्र्यांचे सरकारी घर भ्रष्टाचाराचा महाल असल्याचा अपप्रचार जोरात झाला. केजरीवाल यांचे सरकार आता नाही व भाजपच्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री आहेत. केजरीवाल यांनी बनवलेल्या आलिशान मुख्यमंत्री निवासात त्या राहायला गेल्या नाहीत. दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी अशी माहिती दिली की, `बंगल्याच्या निर्माण कार्यासाठी महागडे मटेरियल वापरले. बंगल्यात अत्याधुनिक रिमोट कंट्रोलद्वारे पंखे, लाईट, एअर कंडिशनर चालू किंवा बंद करता येतात, हा चमत्कारच आहे.’ हे मंत्री लोकांना मूर्ख बनवत आहेत. मुळात आता सामान्य घरातील पंखे, लाईट, एसी, टीव्ही हेदेखील रिमोटद्वारेच चालू-बंद केले जातात. हे आधुनिक युग आहे. आता केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाच्या काळातील हा बंगला लोकांसाठी खुला केला जात आहे व बंगला पाहण्यासाठी 20 रुपयांचे तिकीट विकण्यात येईल. म्हणजे महसूल वाढविण्यासाठी केजरीवाल यांचा बंगला लोकांसाठी खुला केला गेला आहे.

पंतप्रधानांचे घर

केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यात विदेशी मार्बल वापरले असल्याने लोकांनी 20 रुपयांचे तिकीट घेऊन हे मार्बल पाहावे असे मंत्री प्रवेश वर्मा सांगतात. पंतप्रधान मोदी हे जनतेच्या तिजोरीवर उगाच भार टाकणाऱ्या गोष्टी रोज करत आहेत. सध्या पंतप्रधानांचे निवासस्थान हे जागतिक नेत्यांच्या भव्य निवासस्थानांपैकी एक आहे. इंदिरा गांधी या सफदरजंग रोडवरील एका साध्या बंगल्यात राहत. सफदरजंग रोडवरील याच निवासस्थानासमोर लोक कल्याण मार्ग (पूर्वीचा रेसकोर्स रोड) आहे. तेथे 4.9 हेक्टर परिसरात `एकटे’ राहणाऱ्या फकीर मोदींचे निवासस्थान आहे. यात एकूण पाच आलिशान बंगले आहेत. या बंगल्यांना ते `पंचवटी’ म्हणतात. या पंचवटीत `हेलिपॅड’ आहे. हा सर्व खर्च काही मोदी यांनी स्वत:च्या झोळीतून केला नाही. बंगल्यात विदेशी मार्बल, विदेशी काचांचा वापर झाला आहे. हे भव्य निवासस्थान असतानाही दिल्लीत पंतप्रधान मोदींसाठी आणखी एक भव्य निवासस्थान `सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांतर्गत उभारले जात आहे. मोदींची ही दोन्ही निवासस्थाने `तिकीट पी’ करून जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवीत. केजरीवाल यांचा बंगला पाहण्यापेक्षा पर्यटकांना फकीर मोदींचे निवासस्थान पाहायला जास्त आवडेल. दिल्लीतील भाजपच्या सर्वच मंत्र्यांनी आपल्या सरकारी बंगल्याचे जे महाल बनवले आहेत ते पाहण्यासाठी पर्यटकांना आमंत्रित केले पाहिजे. कृष्ण मेनन मार्गावर गृहमंत्री अमित शहा राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी आसपासचे सर्व रस्ते लोकांच्या रहदारीसाठी कायमचे बंद करून ठेवले आहेत. इतके भय वाटत असेल तर मग त्या पदावर राहायचे कशाला?

संसद भवनाचे हाल

भारताचे संसद भवन एक ऐतिहासिक इमारत आहे. आर्किटेक्ट बेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संसद भवन उभारले गेले. जगात अशी भव्य गोलाकार वास्तू नसेल. भारताच्या स्वातंत्र्याबाबत अनेक ऐतिहासिक घटना येथे घडल्या. त्या भव्य संसद भवनास टाळे लावून मोदी यांनी नवे संसद भवन त्याच प्रांगणात उभारले. त्याची गरज नव्हती. नवे संसद भवन हे `गुजरात’मधील एक भव्य मंगल कार्यालय आहे असे वाटते व येथेही उगाच खर्च झाला. संसद देशातील नागरिकांशी जोडली गेली पाहिजे. नव्या संसद भवनाची रचना राजबंद्यांना कोंडून ठेवणाऱ्या व्यवस्थेप्रमाणे आहे. एका फकिराने मनात आले म्हणून ऐतिहासिक संसद भवन बंद केले गेले व नवे संसद भवन उभारण्यात आले. संसद भवन मोदींनी बांधले याची नोंद व्हावी यासाठी 20 हजार कोटी खर्च झाले आणि आता हीच मंडळी केजरीवाल यांच्या बंगल्यावर बोलायला लागले आहेत. हे आश्चर्यच आहे.

शास्त्रीचे घर

पूर्वी केंद्रातले व राज्यातले मंत्री नियमानुसार `एक’च बंगला घेत व त्यातच मर्यादेत खर्च करून कारकीर्द घालवीत. आता दिल्लीतले व महाराष्ट्रातले मंत्री दोन-दोन सरकारी बंगल्यांत राहतात. दिल्लीत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा बंगला मोतीलाल नेहरू प्लेसला होता. एक साधा सरकारी बंगला म्हणून आजही त्याच्याकडे पाहिले जाते. शास्त्री इथे 1952 पासून राहिले. रेल्वे, दळणवळण, वाणिज्य, गृहमंत्री असताना व पुढे 1964 मध्ये पंतप्रधान झाल्यावरही ते याच बंगल्यात राहिले. मोठ्या बंगल्यात जाण्याचे त्यांनी टाळले व स्वत:च्या बंगल्यावर कधी खर्च करून घेतला नाही. आता या बंगल्यात शास्त्रींचे स्मारक झाले आहे. पंतप्रधान मोदी हे लालबहादूर शास्त्रींच्या साधेपणावर भाषणे देतात, पण शास्त्रींच्या साध्या जीवनशैलीचा स्वीकार त्यांनी कधीच केला नाही. दहा लाखांचा सूट, तीन-चार लाखांचा काळा चष्मा, दोन लाखांचे पेन, सवा लाखाचे जोडे, विदेशी कार असा हा पंतप्रधानपदी बसलेल्या भारतीय फकिराचा थाट आहे. पंतप्रधान वापरत असलेल्या या महागड्या वस्तू दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवून जनतेला `तिकीट’ लावून दाखवायला हव्यात.

झोपड्यांवर महाल

मुंबई, गुरगाव, बंगळुरू, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांत भव्य `लक्झरी’ टॉवर्स उभे राहत आहेत. ते घेण्याची ताकद मध्यमवर्गीयांत नाही. मुंबईतील `लक्झरी’ टॉवर्सच्या अनेक इमारतींतले फ्लॉटस् राजकारणी व त्यांच्या मुलांच्या मालकीचे आहेत आणि त्यात ते आलिशान जीवन व्यतीत करीत आहेत. देशाची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे असे या लोकांच्या घरात शिरल्यावर वाटत नाही. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प श्रीमंतांसाठी टॉवर्स उभारणाऱ्या बिल्डरांनी गिळले व त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून `एसआरए’ अधिकाऱ्यांना थेट आदेश गेले. केजरीवाल यांच्या बंगल्यापेक्षा हे प्रकरण गंभीर आहे. जुहू, वांद्रे, विलेपार्ले, पेडर रोडसारख्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली श्रीमंतांचे टावर्स कसे उभे केले जात आहेत, हा चमत्कार पाहण्यासाठी देशभरातील पर्यटकांना मुंबईत बोलवायला हवे. अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदास साजेसा बंगला हा टीकेचा विषय ठरत असेल तर पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बंगल्यांवर झालेला कोटय़वधींचा खर्चही झाकून ठेवता येणार नाही. मलबार हिल परिसरातील मंत्र्यांचे बंगले कसे सजले आहेत हे लोकांना दाखवाच. सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी हे बंगले दाखवण्यासाठी विशेष `शो’चे आयोजन करायला हरकत नाही.

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.