27 मतदारांचा पत्ता बेलापूरचे महापालिका कार्यालय, नवी मुंबईत मतदार नोंदणी विभागाचा कारनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मतदार यादीतील नोंदींची अचूकता तपासण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया राबवली जात असताना बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादीत 27 मतदारांचा पत्ता चक्क मुक्काम पोस्ट नवी मुंबई महापालिकेचे बेलापूर विभाग कार्यालय दाखवण्यात आले आहे. मतदार नोंदणी विभागाचा हा कारनामा उघड झाल्यानंतर या मतदार यादीवर आणि एलआयभार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवली जात असताना शासकीय कार्यालयाचा पत्ता मतदारांचा निवासी पत्ता म्हणून नोंदवला जाणे हा गंभीर प्रकार आहे. या विभाग कार्यालयात गेलो असता तिथे यादीतील एकही मतदार राहात नसल्याचे किंवा तिथे काम करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण हे फक्त कार्यालयात बसून करण्यात आले आहे, असा आरोप मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. महापालिका विभाग कार्यालयाच्या पत्त्यावर २७ मतदारांची नावे कशी नोंदवली गेली, त्यांचे घर क्रमांक म्हणून कार्यालयाचा पत्ता कसा नमूद झाला आणि या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली होती का, असे प्रश्नही काळे यांनी उपस्थित केले.

रहिवाशांची नावे वगळली

बेलापूरमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काही मतदारांच्या नावांबाबतही आक्षेप नोंदवला. मनसेच्या पदाधिकारी शीतल गायकवाड या अनेक वर्षांपासून बेलापूरमध्ये राहात असूनही त्यांच्याकडे एकदाही बुथस्तरीय अधिकारी (बीएलओ) पडताळणीसाठी आले नाहीत, असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नोंदींच्या पडताळणीची मागणी

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेतच अशा नोंदी आढळत असतील तर पडताळणीच्या कामकाजाची तपासणी होणे आहे, अशी मागणीही बेलापूरवासीयांनी केली आहे.

विभाग कार्यालय हे लँडमार्क

बेलापूरच्या यादी भाग क्रमांक 356 मधील 27 मतदार हे जुन्या विभाग कार्यालयाजवळच्या झोपडपट्टी आणि खासगी इमारतीत राहात होते. या मतदारांचा लैंडमार्क म्हणून विभाग कार्यालयाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सध्या हे विभाग कार्यालय सेक्टर 11 मध्ये हलवण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांनी केली आहे.

Comments are closed.