“गौतम गंभीरच्या ‘अष्टपैलू हट्टा’मुळे टीम इंडियाचे नुकसान…”, माजी भारतीय खेळाडू भडकला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (12 सप्टेंबर) खेळला जाणार असून तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. या मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाहुणा म्हणून खेळणार आहे.

या मालिकेआधी भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होते, ते आता त्यातून सावरले असून आगामी मालिकांसाठी सज्ज झाले आहेत. तसेच या मालिकेत निवडलेल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा पाहून माजी भारतीय क्रिकेटपटूने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू एस बद्रीनाथने गंभीरच्या अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या खेळाडूंना फिटनेसच्या समस्या असूनही त्यांना संघात कायम ठेवण्याचे धोरण संघनिवडीस कारणीभूत ठरत आहेत, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

हार्दिक पंड्यामुळे निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा हे पूर्णपणे फिट नसतानाही त्यांना मुख्य संघात स्थान देण्यात आले होते. त्यातील दुखापतीतून न सावरल्याने हर्षित बाहेर झाला आहे, तर सुंदर आणि रेड्डी यांना फिट घोषित केले गेले. या तिघांबाबतच बद्रीनाथने आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रश्न उपस्थित केला आहे.

“हे तिघेही अष्टपैलू गटात मोडतात. सुंदर आणि नितीश निश्चितच ऑल-राउंडर आहेत, मात्र हर्षितला ऑल-राउंडर बनवण्यासाठी खूप अधिक प्रयत्न केले जात आहेत. गंभीर ऑल-राउंडर आणि बहुआयामी क्रिकेटपटू घडवण्यासाठी कटिबद्ध दिसतो. म्हणूनच दुखापतग्रस्त असूनही या तिघांची सातत्याने निवड केली जाते,” असे बद्रीनाथने म्हटले आहे.

“त्यांना पुढचा योग्य अष्टपैलू खेळाडू तयार करता येत नाहीये. हार्दिकनंतर कोणीही असा नाही, जो एक पूर्ण अष्टपैलू आहे, मात्र तरीही ते आणखी अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांमुळे, फिटनेसचे निकष पूर्ण होत नाहीये आणि तरीही त्यांची निवड केली जात आहे”, असेही बद्रीनाथने पुठे म्हटले आहे.

सध्या निवडलेल्या संघातील एका खेळाडूला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. इशान किशन शुक्रवारी नेट प्रॅक्टिसवेळी पाठीच्या दुखापतीमुळे अस्वस्थ दिसला. त्यामुळे मालिका सुरू होण्याआधीच भारताच्या डोकेदुखी वाढली आहे.

इशानला नेटमध्ये नवदीप सैनीच्या गोलंदाजीचा सामना करताना दुखापत झाली. सैनीने टाकलेला आखूड चेंडू उसळी घेत इशानकडे गेला असता, त्याने टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दुखापत झाली. सैनीने तो ठीक असल्याने सांगितले, यामुळे थोडीफार चिंता कमी झाली आहे. (AFGvsIND T20 Series Gautam Gambhir Hell bent on creating all rounders says S Badrinath)

Comments are closed.