लेटमार्क लागलेला पाऊस 2 आठवडे रजेवर
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईसह देशाच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर पावसाने आता ब्रेक घेतला आहे. मात्र, हा ब्रेक बराच लांबण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वांचे टेन्शन वाढले आहे. पुढील आठवडाभर मुंबईसह राज्यात कुठेही दमदार पावसाची शक्यता नाही. त्यापुढच्या आठवड्यातही पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पावसाने या वर्षी लेटमार्क लावला. त्यानंतरही राज्यात अपेक्षित पाऊस पडलाच नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिह्यांमध्ये तर आठवडाभर बेफाम पाऊस झाला. मुंबईसह वसई-विरार, नालासोपारा, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. परंतु आता पावसाने रजा घेतली असून ही रजा दोन आठवड्यांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. सानप यांनी सांगितले की, पुढील काही दिवस तरी दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, अशी स्थिती सध्या नाही. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस कमीच राहणार आहे.
- डॉ. सानप म्हणाले की, महाराष्ट्रात पुढील 7 दिवसांमध्ये पाऊस कमीच होईल. विदर्भ वगळता कुठेही पावसासंदर्भात इशारा नाही. प्रशांत महासागरात फिलीपाईन्सजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळ ‘बावी’चा देखील फटका बसेल.
Comments are closed.