बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

हिंगोली : सोशल मीडियावर विशेषत: इंस्टाग्रामवर रिल्स बनवून हवा करायची, आपल्या चांगल्या-वाईट कामाचं प्रमोशन करायचं आणि आपली समाजाच प्रतिमा तयार करायची, असं काम सध्या जोरात सुरू आहे. अनेकदा काही गुंड प्रवृत्तीचे लोक असे रील्स व्हायरल करुन समाजात आपली दहशत निर्माण करतानाही दिसून येतात. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार येथील खोक्याभाई म्हणजे सतिश भोसलेचे असे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये, हा खोक्या नोटांचे बंडल हातातून फेकून देताना, पैसे उधळताना आणि हॅलिकॉप्टरची भरारी करताना दिसून आला होता. आता, पोलिसांनी या खोक्याभाईच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता, बीडनंतर हिंगोली जिल्ह्यातही अशाच एका भाईची भाईगिरी पोलिसांनी उतरवली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव येथील भाऊ राठोडचे असेच पैसे फेकतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला दणका दिला. त्यानंतर, त्याने हात जोडून माफी मागितली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील भाऊ राठोड हा वाळू माफिया अवैध रेती उपसा करायचा, त्यामधून मिळालेल्या पैशातून गळ्यात सोने आणि समोर पैसे ठेवून रिल्स बनवत दहशत पसरवत होता. सोशल मीडियातून दहशत पसरवणाऱ्या भाऊ राठोडसोबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठकी होत होत्या, याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, या वाळू माफियाच्या दमदाटीला संतापून सेनगाव येथील नागरिकांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांना भाऊ राठोडवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर हिंगोली पोलिसांनी या वाळू माफियाची चांगलीच मस्ती उतरवली आहे. पोलीस खाक्या दाखवताच दाखवत हा वाळू माफिया हात जोडून आता कोणतीही दादागिरी करणार नाही, असं सांगत आहे. तसेच, यानंतर गैर कायद्याचे सर्व काम सोडून देईल असही तो सांगत आहे. पोलिसांनी भाऊ रोठोडसह त्याच्या साथीदारालाही पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर, त्यानेही हात जोडून माफी मागितली आहे. तसेच, यापुढे कुठेही दादागिरी करणार नसल्याचं म्हटलं आहे.

हात जोडून मागितली माफी

पोलिसांनी मला सूचना दिली असून मी कुठलीही दादागिरी करणार नाही, माझा वाळूचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो 2 वर्षांपूर्वीचा होता. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मी माझं ते काम सोडू देईल, असे म्हणत हिंगोलीतील या भाऊने हात जोडून माफी मागितली आहे.

हेही वाचा

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..

Comments are closed.