कसोटीनंतर इंग्लंडमध्येही मानव सुथारचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने संघाची लाज वाचवली!
भारत देशासाठी ६ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण (Test Debut) करणाऱ्या फिरकीपटू अष्टपैलू मानव सुथार आता इंग्लंडमध्येही अप्रतिम कामगिरी करून वाहवा मिळवली आहे. चेंडू आणि बॅटने उत्तम कामगिरी करत मानवने संघाची लाज राखली आणि संघाला पराभवापासून वाचवले. सध्या मानव इंग्लंडमध्ये ‘वॉर्विकशायर’ (Warwickshire) संघाकडून कौंटी क्रिकेट खेळत आहे.
कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-१ मध्ये ‘यॉर्कशायर’ विरुद्धच्या सामन्यात मानवने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ३ बळी घेतले, तर फलंदाजी करताना ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने १ बळी घेतला आणि ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७ चौकार आणि १ षटकार ठोकून ३७ धावा केल्या. पहिल्या डावात मानव ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यॉर्कशायरचा संघ ४६९ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विल्यम लक्सटनने १६७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. प्रत्युत्तरात वॉर्विकशायरचा संघ पहिल्या डावात अवघ्या २६३ धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या यॉर्कशायरने ६ बाद २४६ धावांवर आपला डाव घोषित केला. धावांचा पाठलाग करताना वॉर्विकशायरने ८ बाद ३३३ धावा केल्या आणि हा सामना अनिर्णित (Draw) सुटला. यॉर्कशायरचा संघ विजयापासून अवघे २ बळी दूर राहिला.
आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात मानवने कमाल कामगिरी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) हा किताब जिंकला होता. त्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात ६ बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात १ बळी आपल्या नावावर केला होता. याशिवाय फलंदाजीतही मानवने २८ धावांचे योगदान दिले होते.
मानवच्या प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class) कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत ३१ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ५६ डावांमध्ये गोलंदाजी करताना मानवने १४० बळी घेतले आहेत. तर ५१ डावांमध्ये फलंदाजी करताना १ शतक आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १०४३ धावा केल्या आहेत.
Comments are closed.