भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला मोठा झटका, आयसीसीने दिली धोक्याची घंटा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा सामना १४ जून म्हणजेच रविवारी खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानी संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या पराभवानंतर आयसीसीने आणखी एक शिक्षा सुनावली आहे, ज्यामुळे पाकिस्तानी संघाचे धाबे दणाणले आहेत. सामन्यादरम्यान केलेल्या हलगर्जीपणाचा फटका आता त्यांना सहन करावा लागत आहे.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चे आयोजन सध्या इंग्लंडमध्ये केले जात आहे. १२ जून रोजी या स्पर्धेची सुरुवात झाली, परंतु भारत आणि पाकिस्तानने आपला पहिला सामना १४ जून रोजी एकमेकांविरुद्ध खेळला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने २० षटकांत ६ बाद १७० धावांचा डोंगरासारखा स्कोअर उभा केला होता. जेव्हा पाकिस्तानचा महिला संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा पूर्ण संघ १७ षटकांत अवघ्या १०६ धावांवर गारद झाला. भारताने हा सामना ६४ धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला.
भारताची सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने ४४ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली. तिने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूत ३६ धावा केल्या. तर ऋचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये येत १७ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. तिने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. याच कारणामुळे टीम इंडिया एवढा मोठा स्कोअर उभा करण्यात यशस्वी ठरली. यानंतर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली, तेव्हा दीप्ती शर्माने एकटीनेच ४ षटकांत अवघ्या १० धावा देत पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडले. याशिवाय श्रीचारणीला ३ आणि शेफाली वर्माला देखील १ यश मिळाले.
दरम्यान, सामना सुरू असताना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना एक चूक करून बसली. पाकिस्तानी संघाने आपले षटक पूर्ण करण्यासाठी खूप जास्त वेळ घेतला. आयसीसीने संघाला ‘स्लो ओव्हर रेट’ (संतुलित गतीने षटके न टाकणे) प्रकरणी दोषी मानले आहे. म्हणूनच संघाला मॅच फीच्या ५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत जेव्हा २० षटके पूर्ण व्हायला हवी होती, तेव्हा संघाने एक षटक कमी टाकले होते, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने आपली चूक मान्य केली आहे, ज्यामुळे या प्रकरणात आता पुढे कोणत्याही सुनावणीची गरज उरलेली नाही.
Comments are closed.