“शमीची निवड न होण्यामागे वय अडथळा नाहीच”, माजी क्रिकेटपटूने स्पष्टीकरण देताना विराट-रोहितची दिली उदाहरणे

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या राष्ट्रीय संघात परतण्याचा आशा जवळपास संपल्यात जमा झाल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही भारतीय निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो दुखापतींनी त्रस्त होता आणि आता बराच काळ झाला तो भारतीय संघातून बाहेर आहे. दुसरीकडे अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती नव्या खेळाडूंना संधी देत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. शमीला नेहमीच डालवले जात असल्याने अनेकांनी त्याचे वय त्याच्या निवड न होण्यामागचे कारण आहे, असे मत व्यक्त केले. याबाबत माजी भारतीय खेळाडूने एक वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा शमीपेक्षा वयाने मोठा असूनही सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी म्हटले की, शमीला संघातून वगळण्यामागे त्याचे वय हेच कारण नाही.
माध्यमांशी बोलताना चोप्रा म्हणाले, “शमी आणि स्टार्क यांच्यात खूप मोठा फरक आहे. स्टार्क फिट असून सातत्याने खेळत आहे. जेव्हा जेव्हा तो मैदानावर परतला तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व केले आहे. शमी दुखापतग्रस्त झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तो बराच वेळ मैदानापासून दूर राहिला. तो देशांतर्गत क्रिकेटमधून मैदानावर परतला, मात्र त्याच्या वेगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याने विकेट्स घेतल्या, मात्र त्याच्या गोलंदाजीत तेवढी तीव्रता नव्हती.”
“वय हा त्याच्या निवड न होण्यामागचे कारण आहे, हे हास्यास्पद आहे. केवळ वयामुळे एखाद्याला संघातून वगळणे शहाणपणाचे नाही, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची अजुनही निवड होत आहे. त्यामुळे माझ्यामते, वय हे एक कारण नाही. निवडकर्ते भविष्यात त्याची कारणे स्पष्ट करतील,” असे चोप्रा यांनी पुढे म्हटले आहे.
शमीने नुकतेच आपला 100वा प्रथम श्रेणीचा सामना खेळला. त्याने हा पराक्रम चेन्नईमध्ये खेळला गेलेला दुलीप ट्रॉफी 2026चा अंतिम सामन्यात केला. तेव्हा तो म्हणाला, “वयाची 36 वर्षे ओलांडली, तरी क्रिकेट खेळण्याची भूक कमी झालेली नाही. मी नेहमीच शिकत असतो आणि पुढेही शिकत राहू इच्छितो.”
शमी भारतासाठी शेवटचा सामना 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामने खेळला होता. तसेच त्याने 2023च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशपीच्या अंतिम सामन्यानंतर एकही कसोटी सामना भारतासाठी खेळलेला नाही. (“Age is not a hurdle for Mohammed Shami Selection,” a former cricketer clarifies, citing examples of Virat Kohli & Rohit Sharma)
Comments are closed.