इंग्लंडने लोळवले, आता ICC ने झोडपले! पाकिस्तान संघाची अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना’
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व गाजवत पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं. तीन्ही सामने जिंकत मालिकी खिशात घातली आणि पाकिस्तानला जबर हादरा दिला. इंग्लंडने दिलेल्या या हादऱ्यातून पाकिस्तान सावरणार तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तानवर दुहेरी कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, एडजबॅस्टन कसोटीदरम्यान निर्धारित वेळेचा विचार करता पाकिस्तान संघ तब्बल 11 षटके मागे राहिला होता. याच कारणामुळे खेळाडूंवर मॅच फीच्या 50 टक्के दंड आणि चालू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात 11 गुणांची कपात करण्याची कारवाई करण्यात आली. मैदानातील पंच पॉल रायफेल आणि ख्रिस गॅफनी, तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच रसेल वॉरेन यांनी लावलेल्या आरोपांनंतर आयसीसीच्या मॅच रेफ्रींच्या एलीट पॅनेलचे रंजन मदुगले यांनी ही शिक्षा सुनावली.
या 11 गुणांच्या कपातीमुळे पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. ICC च्या या दणक्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत संघ सर्वात तळाशी म्हणजेच नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. सध्या पाकिस्तानचा गुण टक्का (PCT) अवघा 4.63 इतकाच राहिला आहे. या दंडामुळे आता पाकिस्तानचे डब्ल्यूटीसी (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे.
Comments are closed.