ट्रॉफी चोर मोहसिन नक्वी आणखी कधीपर्यंत असणार ACC अध्यक्ष? किती दिवसांचा कार्यकाळ शिल्लक

आयसीसी महिला आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना काल म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने आशिया चषकाच्या ट्रॉफीवर नावं कोरलं. पण त्यानंतर जेव्हा ट्रॉफी वितरणाचा कार्यक्रम होणार तेव्हाच पुरुष आशिया कपमध्ये जेव्हा भारतीय संघ जिंकला होता तशीच परिस्थिती निर्माण झाली.
म्हणजेच आजच्या तारखेला क्रिकेटच्या जगात ‘ट्रॉफी चोर’ अशी चर्चा झाली, तर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांचेच नाव समोर येईल. कारण नक्वी भारताच्या दोन आशिया कप ट्रॉफी घेऊन बसले आहेत. आता प्रश्न असा आहे की, ते आणखी किती काळ एसीसी म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष राहणार? गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत, त्यावरून त्यांच्या पदावरून जाण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian cricket women’s team) अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावले. मात्र मोहसिन नक्वी यांच्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी मिळू शकली नाही. आशिया कपचे आयोजन एसीसी करते आणि त्याचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचेही अध्यक्ष आहेत.
आशिया कप झाल्यावर नक्वी हेच ट्रॉफी देण्यासाठी उपस्थित राहतात. मात्र भारतीय संघाची भूमिका स्पष्ट आहे की, ते नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करून आशिया कपचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळीही मोहसिन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी आले होते. मात्र भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. तरीही नक्वी आपल्या पदावर कायम राहिले आणि भारताला ट्रॉफीशिवायच मायदेशी परतावे लागले. यावेळीही असेच काही घडले. फरक एवढाच की, यावेळी पुरुषांऐवजी भारतीय महिला संघाला ट्रॉफीशिवाय मायदेशी परतावे लागले.
दरम्यान, मोहसिन नक्वी यांच्या पदाची उलटी गिनती सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. नक्वी यांचा एसीसी अध्यक्ष म्हणून कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत आहे. म्हणजेच त्यांच्या कार्यकाळासाठी साधारण सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. एसीसीच्या अध्यक्षपदावर पुन्हा निवड होण्याची शक्यता असते. मात्र नक्वी यांना पुन्हा या पदावर संधी मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे स्पष्ट आहे. नक्वी यांच्या कारभाराकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. एसीसी अध्यक्षांची निवड संस्थेच्या सदस्यांच्या मतदानातून होते. मात्र काही सदस्य वगळता इतर सदस्य नक्वी यांच्या बाजूने नसल्याचे सांगितले जात आहे.
मोहसिन नक्वी यांनी एप्रिल 2025 मध्ये एसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. एसीसी अध्यक्षांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2027 मध्ये संपणार आहे. तसेच, एसीसीचे अध्यक्षपद रोटेशन पॉलिसीनुसार दिले जाते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी बदलत राहते. त्यामुळे नक्वी यांना पुन्हा हे पद मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पुढील आशिया कप मे 2027 मध्ये होणार आहे. तोपर्यंत मोहसिन नक्वी एसीसी अध्यक्षपदावर नसतील आणि त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडला गेलेला असेल. पुढील आशिया कप बांगलादेशमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच 2027 मध्ये आशिया कप वनडे क्रिकेटच्या स्वरूपात खेळवला जाणार आहे.
Comments are closed.