वयाचा घोटाळा! 3-3 जन्म दाखले आढळल्याने BCCI ने खेळाडूवर घातली दोन वर्षांची बंदी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एका खेळाडूवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियासाठी निवडण्यात आलेल्या 19 वर्षांखालील संघामधील बंगालच्या फिरकीपटूवर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. वयाबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी रोहित यादव याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या रोहितची नुकतेच मायदेशात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली होती. तसेच तो जुलै महिन्यात भारताच्या 19 वर्षांखालील संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावरही गेला होता. तेथे त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यात महत्त्वाची भुमिका बजावली होती.
रोहितवर दोन वर्षांची बंदी
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस राजकोट आणि अहमदाबाद येथे भारताचा 19 वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि बहुदिवसीय सामने खेळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये रोहितचा समावेश होता.
रोहितची तीन-तीन जन्मदाखले
श्रीलंका दौऱ्यावेळी रोहितच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असताना त्याच्या वयातील अंतर उघडकीस आले. त्याच्याकडे 2007, 2009 आणि 2010 अशा वेगवेगळ्या जन्मवर्षांची तीन जन्म प्रमाणपत्रे आहेत. त्यामुळे तो वयोगट खेळण्यास अपात्र ठरतो.
जेव्हा रोहितने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) मध्ये नोंदणी केली, तेव्हा त्याचे जन्मवर्ष 2007 असे नोंदवले गेले होते. त्यानंतर 2017 आणि 2020 मध्ये केलेल्या अपडेट्समध्ये त्याचे जन्मवर्ष 2006 असे दाखवण्यात आले. 2021 मध्ये त्याच्यामध्ये पुन्हा बदल झाला आणि ते 2009 करण्यात आले होते.
नियमांचे उल्लंघन केल्याने CAB ने रोहितला निलंबित केले असून त्याची माहिती बीसीसीआयला दिली. त्यानंतर मंडळाने त्याच्यावर दोन वर्षांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली असून सर्व संबंधित राज्य संघटनांनाही याची माहिती दिली आहे.
62 खेळाडूंवर CAB ची कारवाई
वयासंबंधित आणि कागदपत्रांमधील विसंगतीमुळे CAB ने रोहितसह 62 खेळाडूंना 2026-27 आणि 2027-28 हंगामांदरम्यान कोणत्याही स्पर्धेंसाठी नोंदणी करण्यास अपात्र घोषित केले आहे. (Age misrepresenting BCCI bans Rohit Yadav for two years)
Comments are closed.