पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर क्राईम न्यूज: अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे.
आरोपी मुलगा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक दृष्ट्या माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती किरकोळ कारणावरुन सुहास गवारे उर्फ मामा याने आईशी वाद घालत तिला मारहाण केली होती. यामध्ये सुहास गवारेने आपल्या आईला भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिचा निर्घृण खून केला. विशेष म्हणजे आरोपी सुहास गवारे याने आईच्या मृतदेहाजवळच गोट्या खेळत स्वतःलाच घरात कोंडून घेतलं होतं. यावरुन तो मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समजत आहे. माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर स्टोरी स्टेटस ठेवण्यावरुन दोन गटात वाद; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बीडच्या आष्टी येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या किरकोळ वादातून आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे मित्रांच्या दोन गटात हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. यात दीपक शिवाजी नालकोल या 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसाने एका आरोपीला अटक केली. तर दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले आहे.
अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून नागरिकांनी एका 35 ते 40 वर्षीय युवकाला बेदम मारहाण केली आहे. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्या युवकाला नागरिकांच्या ताब्यातून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले. लहान मुलांना पळवणारी टोळी शहरात सक्रिय असल्याची अफवा अमरावतीत जोराने सुरू असून अशी कोणतीही टोळी सक्रिय नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अमरावती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Beed : सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
आणखी वाचा
Comments are closed.