पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान, अहिल्यानगरात 79 टक्के पेरणी पूर्ण, सोयाबीन-कापसाचे निम्म्याहून अधिक क्षेत्रावर वर्चस्व

यंदाच्या खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यात पेरणीने चांगलाच वेग घेतला असून, आतापर्यंत ५ लाख ६० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ७९ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी उरकली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारल्याने पिकांच्या उगवणीबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागांत सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे.

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, हा तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. दुसरीकडे अकोले तालुक्यात केवळ २१ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची नोंद झाली असून, ती सर्वात कमी आहे. याशिवाय श्रीरामपूर, राहाता, राहुरी, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमध्येही पेरणीचे प्रमाण जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

पिकांना नवसंजीवनी

मध्यंतरीच्या पावसाच्या खंडामुळे उगवण झालेल्या पिकांवर ताण निर्माण झाला होता. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, बाजरी आणि कडधान्य पिकांसाठी ओलाव्याची गरज भासत होती. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून, पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, पुढील वाढीच्या टप्प्यात पावसाने सातत्य राखणे आवश्यक असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

सोयाबीन, कपाशीला पसंती

यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांना सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार २२५ हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ३३ हजार १० हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. या दोन्ही पिकांनी मिळून एकूण पेरणी क्षेत्राच्या सुमारे ५१ टक्के क्षेत्रावर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्याची खरीप अर्थव्यवस्था या दोन पिकांवर अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इतर पिकांमध्ये ९७ हजार २९० हेक्टरवर मका, ७४ हजार ३७३ हेक्टरवर तूर, ४१ हजार २८७ हेक्टरवर बाजरी, ३५ हजार ८५५ हेक्टरवर उडीद आणि १८ हजार १५१ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे.

Comments are closed.