निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार 24 तासापासून गायब, अपहरण केल्याचा संशय
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युत्या तर काही ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत. तर कुठं स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही महानगरपालिकांमध्ये काहीजण बिनविरोध देखील निवडून गेले आहेत. अशातच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे.
मनसेचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल, तपासाची मागणी
केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा संशय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. मनसेचे पदाधिकारी पोलीस कोतवाली स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली तपासाची मागणी केली आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17 अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 5 अर्ज बाद
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक म्हणजेच 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले असून, हा पक्षासाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे. मात्र, शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज बाद झाले, त्यांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात, कोणत्या प्रभागात लढत रंगते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.