राहात्यातील गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे पुण्यापर्यंत, मशीन पुरवणारा ‘डॉक्टर’ पोलिसांच्या रडारवर
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता ‘पुणे कनेक्शन ‘पर्यंत पोहोचला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले मशीन पुरविणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांतील एक डॉक्टर आहे. दोघेही सध्या पुण्यातील एका अन्य गुन्ह्यात अटकेत असल्याने या प्रकरणातही त्यांना आरोपी करण्यात आले आहे. लवकरच श्रीरामपूर पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत.
या रॅकेटमध्ये ‘आयएमए’चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह दोन एजंटांना जेरबंद केले होते. तपासादरम्यान, पुण्याच्या दोघांनीच हे मशीन पुरविल्याचे समोर आले आहे. त्यांनी आजवर कोणाकोणाला अशी मशीन्स पुरवली, याचा सखोल तपास आता केला जाणार आहे.
या प्रकरणातील गर्भलिंग चाचणी केलेल्या महिलांची आणि या साखळीतील इतर एजंटांची चौकशी करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, दोन महिलांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. अनेक एजंटांची नावेही समोर आली असून, लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील गर्भलिंग निदानाची ही काळी बाजू समोर येत असतानाच, तालुक्यातील ११ गावांमधील लिंग-गुणोत्तराची भीषण आकडेवारी समोर आली आहे. पालिकेतील एका कार्यक्रमात आमदार हेमंत ओगले यांनी मांडलेल्या वास्तवानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. बेलापूर खुर्द गावात झालेल्या बैठकीत वाघचौरे यांनी मुलींच्या घटत्या संख्येमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाईचे सूतोवाच केले होते. गावागावात प्रबोधनपर कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
रॅकेटची खोलवर रुजली पाळेमुळे
एकीकडे गर्भलिंग निदानाची रॅकेट उघड होत असताना दुसरीकडे घसरलेला हा जन्मदर म्हणजे ‘स्त्रीभ्रूणहत्ये’चेच भयावह संकेत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आता गर्भलिंग चाचणी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे धाबे दणाणले आहे. दररोज नवनवे खुलासे होत असल्याने हे रॅकेट किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट होत आहे.
Comments are closed.