पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष; भोंदू महाराजासह त्याच्या भावाला पोलीस कोठडी, टेंभुर्णी पोलिसांची कारवाई
आर्थिक अडचण दूर करून ‘पैशांचा पाऊस पाडतो,’ असे आमिष दाखवत अघोरी विधीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग उर्फ नाना उर्फ माऊली महाराज बापूराव विरकर (वय २२), विकास बापूराव विरकर (वय २५, रा. विरकर वस्ती, वडोली ता. माढा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलेश बाळासाहेब भोईटे (वय ३२, रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर) यांची आरोपींशी फेब्रुवारी २०२४ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादीला आरोपींनी आढेगाव येथील मठात बोलावले. यावेळी महाराज उर्फ गुरुमाऊली यांनी फिर्यादीच्या आधार क्रमांकावरून पॅन क्रमांक अचूक सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर आर्थिक संकट दूर करतो, पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून विविध वस्तू व अघोरी विधीच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे उकळण्यात आले. तसेच नवशिव सह्याद्री अॅग्रो फार्म लिमिटेड कंपनीत भागीदार करतो, असे आमिष दाखवत बनावट कागदपत्रेही देण्यात आली. मात्र, कंपनी अस्तित्वात नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली असता, आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल अत्राम यांनी तपासात सहभाग घेत दोन पथके तयार केली होती. आरोपींचा शोध घेऊन दोघांनाही शुक्रवारी (दि. ८) अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राहुल अत्राम, उपनिरीक्षक सागर गायकवाड, सहायक उपनिरीक्षक विलास रणदिवे, संदीप गिरमकर, संतोष पाटेकर, सुरज मुलानी व संदीप साखरे यांच्या पथकाने केली.
Comments are closed.