वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप', आयपीएल दरम्यान अजब दावा; बॅट लॅबमध्ये पाठवण्याची मागणी
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकले. आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले. हे पाहून पाकिस्तानी खवळले असून त्यांनी वैभवच्या बॅटमध्ये ‘AI चिप’ असल्याचा अत्यंत हास्यास्पद आरोप केला आहे. भारतीय क्रिकेटपटूच्या चमकदार कामगिरीवर पाकिस्तानकडून अशा प्रकारचे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
एकीकडे वैभव आपल्या तुफानी फलंदाजीसाठी जगभरातून कौतुकाचा वर्षाव मिळवत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये मात्र जगावेगळ्याच चर्चा रंगताना दिसत आहेत. पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाज यांनी वैभवच्या बॅटमध्ये चिप असल्याचा आरोप केला आहे.
’हमारी वेब डॉट कॉम’च्या यूट्यूब चॅनलवर बोलताना नौमान नियाज म्हणाले, “याबद्दल विचार करा. तो मुलगा नक्की काय आहे? त्याची बॅट तपासा. ज्याप्रमाणे वाडा (WADA – वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी) डोप टेस्ट करते, त्याप्रमाणे त्याची बॅट चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवा. तो बहुधा बॅटमध्ये ‘AI चिप’ वापरत असावा.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “काय खेळाडू आहे? मला असे वाटत होते की तो संथ खेळत आहे. या गोष्टीने मला विचार करायला भाग पाडले की हा मुलगा नक्की कोण आहे. जेव्हा तुम्ही १८ वर्षांचे असता, तेव्हा तुमचे स्नायू, बायसेप्स आणि ट्रायसेप्स तयार होत असतात. तो तर फक्त १६ वर्षांचा आहे. त्याचा जन्म तेव्हा झाला होता जेव्हा विराट कोहली विश्वविजेता बनला होता.”
चालू हंगामात वैभवची बॅट चांगलीच तळपत आहे. त्याने ८ सामन्यांच्या ८ डावांत ५९.५० च्या सरासरीने आणि १८७.८९ च्या स्ट्राईक रेटने ३५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि २ अर्धशतके झळकली आहेत.
वैभवच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत. या १५ सामन्यांच्या १५ डावांत फलंदाजी करताना वैभवने ४०.६० च्या सरासरीने आणि २२२.२६ च्या स्ट्राईक रेटने ६०९ धावा केल्या आहेत. या प्रवासात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
Comments are closed.