आरसीबीचा ‘रॉयल’ कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 39 व्या सामन्यात सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक थरारक आणि ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले. आरसीबीने दिल्लीला अवघ्या 75 धावांत रोखून या हंगामातील सर्वात निचांकी धावसंख्येची नोंद केली. अनुभवी विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी कोणतीही घाई न करता संयमी फलंदाजी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना एकही संधी न देता या जोडीने आरसीबीला 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवून दिला.
आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील सर्वात खराब
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळेल हा पाटीदारचा अंदाज खरा ठरला. दिल्लीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आरसीबीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 8 धावांत संघाने 6 गडी गमावले होते. आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे. पॉवरप्ले संपला तेव्हा दिल्लीची धावसंख्या केवळ 13 धावा आणि 6 गडी बाद अशी होती.
पदार्पण करणाऱ्या साहिलला भोपळाही फोडता आला नाही. अनुभवी केएल राहुल केवळ 1 धाव काढून बाद झाला. समीर रिझवी तर गोल्डन डकचा (0 धावा) शिकार ठरला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स फक्त 5 धावा करू शकला. कर्णधार अक्षर पटेल शून्यावर बाद झाल्याने संघ पूर्णपणे दबावाखाली आला. नितीश राणाही 9 चेंडूत फक्त 1 धाव काढून माघारी परतला. जेव्हा दिल्लीचा संघ 50 धावाही पूर्ण करेल की नाही अशी चिन्हे होती, तेव्हा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आलेल्या अभिषेक पोरेलने 33 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी केली, ज्यामुळे दिल्लीला 75 धावांपर्यंत पोहोचता आले. दिल्लीचा संपूर्ण संघ 16.3 षटकांत तंबूत परतला.
जोश हेझलवूडची धारदार गोलंदाजी
आरसीबीच्या विजयाचा पाया वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने रचला. त्याने आपल्या भेदक माऱ्याने दिल्लीच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले आणि महत्वपूर्ण 4 बळी टिपले. भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले.
कोहली-पडिक्कलची संयमी खेळी
लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळूरने अवघ्या 6.3 षटकांत विजय मिळवला, म्हणजेच त्यांनी 13.3 षटके आधीच जिंकली. बंगळूरने जेकब बेथेलच्या रूपाने फक्त एक विकेट गमावली. बेथेलने एक चौकार आणि दोन षटकारांसह 20 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 22 चेंडूंमध्ये 51* धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या.
विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
विराट कोहलीने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 11 धावा करून किंग कोहलीने आयपीएलमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या. तो आयपीएलमध्ये 9000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या या ऐतिहासिक कामगिरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधीच कोहलीच्या नावावर आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.