मोठी बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला. अजिंक्य नाईक पुन्हा एकदा अध्यक्ष बनले आहेत. जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख, डायना एडलजी, विहंग सरनाईक आणि सूरज सामंत यांनी अर्ज भरला होता. मात्र, या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.
Ajinkya Naik MCA President: अजिंक्य नाईक पुन्हा अध्यक्ष
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी असताना अमोल काळे यांचं निधन झाल्यानं अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. अजिंक्य नाईक आता पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. अजिंक्य नाईक 23 जुलै 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. नाईक यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यावेळी अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड- नवीन शेट्टी यांच्यात सामना
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी डायना एडलजी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, नवीन शेट्टी, प्रसाद लाड, राजदीपकुमार गुप्ता, शहाआलम शेख, सूरज सामंत, विहंग सरनाईक यांनी अर्ज केले होते. त्यापैकी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांनी अर्ज कायम ठेवले. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांच्यात लढत होईल.
अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतला. शाह आलम शेख यांनी सेक्रेटरी पदाचा अर्ज ठेवला आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज अजिंक्य नाईक यांना भरता येणार नाही असं त्यांच म्हणणं होतं.
अजिंक्य नाईक बिनविरोध, चार जागांसाठी निवडणूक
१) अध्यक्ष- अजिंक्य नाईक- बिनविरोध
२) उपाध्यक्ष- जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी
३) सचिव- शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर
४) सहसचिव – गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले
५) खजिनदार – अर्मान मलिक- सुरेंद्र शेवाळे
न्यायालयानं निर्णय राखून ठेवला
मुंबई क्रिकेट एसोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. शहर दिवाणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शाह आलम शेख यांनी अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं होतं. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नसल्याचा दावा शहा आलम शेख यांचा होता. सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळात एकच असल्याने कोणत्याही नियमांच उल्लंघन झालं नसल्याचं अजिंक्य नाईक यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा
Comments are closed.