अजिंक्य रहाणेला दुहेरी धक्का! या कारणामुळे बीसीसीआयने ठोठावला लाखोंचा दंड
IPL 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. या हंगामात केकेआरला अजूनही पहिला विजय मिळवता आलेला नाही. संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत, तर काही आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत. अशा परिस्थितीत 14 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यातही केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यानंतर बीसीसीआयने कर्णधार अजिंक्य रहाणेवर मोठी कारवाई करत 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे.चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात केकेआर संघाने निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. मंद गतीने षटके टाकल्यामुळे सामन्यादरम्यानच संघावर शिक्षा झाली होती. ज्यामुळे संघावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला.यानंतर सामनाधिकारीांनी केकेआरला मंद षटकगतीसाठी दोषी ठरवत कर्णधार अजिंक्य रहाणेवर 12 लाख रुपयांचा दंड लावला. आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम 2.22 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला, जो किमान षटकगतीशी संबंधित नियमांशी निगडीत आहे. ही या हंगामातील केकेआरची पहिली चूक असल्याने केवळ कर्णधारावरच दंड लावण्यात आला आहे.
मात्र, पुढील सामन्यांमध्ये पुन्हा अशीच चूक झाल्यास शिक्षा अधिक कठोर होईल. पुढच्या उल्लंघनासाठी रहाणेवर 24 लाख रुपयांचा दंड बसू शकतो. तसेच, प्लेइंग इलेव्हन आणि इमपॅक्ट खेळाडूवरही सामन्याच्या फीच्या 25 टक्के किंवा 6 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान, केकेआरची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. पाचपैकी चार सामने संघ हरला असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे संघाच्या खात्यात केवळ एकच गुण जमा आहे. अशा परिस्थितीत पुढील सामन्यांमध्ये केकेआरला शिस्त आणि कामगिरी या दोन्ही बाबतीत सुधारणा करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
Comments are closed.