शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
पुणे जमीन घोटाळा: कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तज्ञ वकिलांमार्फत त्याचा अभ्यास करायचा असतो. मुंढव्यातील जमीन व्यवहारात ही खबरदारी घेण्यात आली नाही. मला याबाबत माहिती असती तर मी हा व्यवहार होऊन दिला नसता, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. मुंढवा आणि बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या मुलाची पार्थ याची पाठराखण केली. कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारात (Koregaon Land Scam) एका रुपयाचीही देवाणघेवाण झालेली नाही. विक्रेत्याला कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत. जमिनीचा ताबा घेण्यात आलेला नाही. मात्र, या व्यवहारात खरेदीखत करायला नको होते. ते कसे करण्यात आले, ते माहिती नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. चौकशी समितीच्या अहवालातून याबाबतचे सत्य समोर येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. (Mundhwa Land Scam)
सध्या गाजत असलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारामुळे अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार विरोधकांच्या रडारवर आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर अजित पवार शनिवारी पहिल्यांदाच पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत मुंढवा जमीन व्यवहार चुकीचा असल्याची कबुली दिली तरी आपल्या मुलाची पाठराखण केली. हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी अद्याप पार्थला भेटलेलो नाही. उद्या मी त्याच्याशी बोलेन. कितीही विश्वासू लोक असले तरी असे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा करुन घ्यायचे असतात. भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
मुंढव्यातील किंवा बोपोडीतील व्यवहार असो, ती जमीन शासनाची होती. त्यामुळे नोंदणी अधिकाऱ्यांनी हा व्यवहार थांबवणे गरजेचे होते. यामध्ये प्रथमदर्शनी जे तीन लोक दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आली आहे. ही समिती भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करेल. मी नियमाने काम करणारा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाहीत. मात्र, या सगळ्यात माझी बदनामी झाली. त्यामुळे मी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगून ठेवले आहे की, माझ्या कितीही जवळचा नातेवाईक किंवा व्यक्ती असला तरी नियमाच्याबाहेर जाऊन काम करु नका, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
आणखी वाचा
Comments are closed.