रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
अजित पवार यांचा विमान अपघात : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून (Ajit Pawar Death Plane Cras) राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय सातत्याने व्यक्त केला असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र आता याच प्रकरणात भाजप युवा मोर्चाने रोहित पवार यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे.
रोहित पवार यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले आहेत. तपास यंत्रणांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अनेक तांत्रिक मुद्दे पुढे आणले. या प्रकरणात DGCA आणि इतर तपास यंत्रणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची ठाम भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. अपघाताची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या भेटींमुळे या प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवरही राजकीय स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाने या प्रकरणात नवा आरोप करत रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावर बोट ठेवले आहे. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळेच विमान अपघात झाला असण्याची शक्यता असल्याचा दावा भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar Death Plane Crash: मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप केला आहे. या कारखान्याच्या धुरामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच त्वचेच्या तक्रारी भेडसावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय या प्रदूषणाचा परिणाम शेतीवरही होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांना आव्हान
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्या दिवशी बारामती परिसरात धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती का, औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके निर्माण झाले होते का, याची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणीही सोलनकर यांनी केली आहे. तसेच साखर कारखान्यातून निघणारा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो का, याबाबत रोहित पवार यांनी स्वतः सादरीकरण करून भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांनी आरोप फेटाळले
मात्र या सर्व आरोपांना रोहित पवार यांनी स्पष्टपणे फेटाळले आहे. हे आरोप पूर्णपणे राजकीय द्वेषातून केले जात असून त्यामागे कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.