सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत

सोलापूर : जळगाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दिवसभरातील या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जामनेर येथील अपघाताच्या घटनेत सुदैवाने एक वर्षाची चिमुकली बचावली.

अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या बसला मुरूमने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात अक्कलकोट तालुक्यातील चंद्रभागा लाडप्पा हडपद (वय 18) आणि धाराशिव जिल्ह्यातील चांगदेव श्रीरंग लवटे (वय 76) या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता मी एसटी बसला धडक दिल्यानंतर डंपरने अक्षरशः पेट घेतला. या धडकेत एसटी बसच्या पुढच्या बाजूचं मोठं नुकसान, काही प्रवासी गंभीर जखमी तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.  दरम्यान, मृत्यू झालेल्या प्रवाशांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे

जळगावमध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि सोनाली गोपाल खडके (वय 45, रा. सातबारा) हे दुचाकीवरून घरी परतत असताना नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीने समोरील ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा

अभिजीत बिचकुलेंनी करुणा मुंडेंना मागे टाकलं; बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत कोण ठरला 2 नंबरचा उमेदवार?

आणखी वाचा

Comments are closed.