अकोल्यातील ‘कप ऑफ कम्फर्ट’मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; कॅफेच्या स्पेशल केबिनमध्ये गैरप्रकार
अकोला : शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या जीएमडी मार्केट समोर असलेल्या ‘कप ऑफ कम्फर्ट’ नावाच्या कॅफेमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 29 वर्षीय तरुणाने 33 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अकोल्यातील काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या ‘स्पेशल केबिन’ सुविधेमधून गैरप्रकार घडत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शुभम गजानन टाले (वय 29, रा. सांगवी मोहाडी, अकोला) याच्याविरोधात बीएनएस कलम 64, 64(2)(मी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियातून ओळख अन् कॅफेमध्ये अत्याचार
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती वारंवार मारहाण करायचा, त्यामुळे ती वेगळी राहू लागली होती. याच दरम्यान शुभम टाले या तरुणाशी तिची सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीतून मैत्री वाढत गेली आणि शुभमने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला ‘कप ऑफ कम्फर्ट’ कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. मात्र, नंतर शुभमने लग्नास नकार देत तिच्याशी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.
‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली सुरू गैरप्रकार?
अकोल्यातील काही कॅफेमध्ये तरुणाईसाठी ‘प्रायव्हेट केबिन’ची सुविधा दिली जाते. पडदे लावलेल्या या केबिनमध्ये सीसीटीव्ही नसल्याने अनेकदा त्यांचा गैरवापर होत असल्याचे बोलले जाते. अशा केबिनसाठी 2 ते 3 हजार रुपये अतिरिक्त आकारले जातात. या पार्श्वभूमीवर महिलेवर कॅफेमध्ये झालेल्या अत्याचाराने शहरातील अशा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नितीन देशमुखांनी या आधीच आवाज उठवला होता
अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वी अशा कॅफेंविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी काही ठिकाणी अचानक भेटी देऊन अल्पवयीन मुलामुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड केलं होतं. यानंतर त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, अंमलबजावणीत झालेल्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारांचे प्रमाण थांबलेले नाही, हेच पुन्हा स्पष्ट झालं आहे.
पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
अकोल्यातील अनेक कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचे अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत. अनेक कॅफेंमध्ये ‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली तरुण-तरुणींना प्रायव्हसी देण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा गोरखधंदा अकोल्यात सुरू आहे.
शहरातील रणपिसे नगर, जवाहर नगर, न्यू तोष्णीवाल लेआऊट या भागातील अनेक कॅफेंमध्ये असे गैरप्रकार सुरू आहेत. मात्र कॅफे मालकांकडून पोलिसांना हप्ते सुरू असल्याने या प्रकारांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.
यासंदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही, तर अनेक तरुण-तरुण आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अकोल्याचे ‘दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक’ अशी प्रतिमा असलेले अर्चित चांडक यांनीच आता याप्रकरणी लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
या प्रकरणामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तीवर आणि त्यांना ‘व्यवस्था’ पुरवणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. महापालिका, पोलीस आणि इतर यंत्रणा आता याबाबत कोणती पावले उचलतात, याकडे अकोल्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.