वीज बिल वाटणाऱ्या तरूणाच्या हातात लोकशाहीची झेंडा; अकोल्यातील मंगेश झिनेला भाजपची थेट उमेदवारी
अकोला : राजकारणात पैसा, ताकद आणि वंशवादाचाच बोलबाला असतो, अशी सर्वसाधारण समजूत असताना अकोल्यातून समोर आलेली एक घटना मात्र या समजुतीला छेद देणारी ठरत आहे. भाजपने अकोला महापालिकेतील (Akola Municipal Corporation Election 2026) प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब घरातील तरुणाला थेट नगरसेवकपदाची उमेदवारी दिली असून, ही बाब सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे. जोपर्यंत काही दिवसांपूर्वीपर्यंत मंगेश हा अकोल्यातील खडकी भागात महावितरणचं वीज बिल वाटप करणारा एक सामान्य कर्मचारी होता. मात्र, 30 डिसेंबरनंतर त्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि तो थेट महापालिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला.
Akola Mahanagar Palika Election : संघर्षशील कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी
मंगेश झिनेचं कुटुंब हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आलं आहे. मंगेशची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाचा संसार चालवते, तर वडील चौकीदारीचं काम करून उदरनिर्वाह करतात. अकोल्यातील खडकी भागात एका खोलीच्या भाड्याच्या घरात राहणारं हे कुटुंब आज अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचं काम करणाऱ्या मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवकपदाचा उमेदवार होऊ, याची कल्पनाही नव्हती. मात्र, भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. म़ंगेशला प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून स़धी देण्यात आली आहे.
Akola Election 2026 : दिग्गज नगरसेवकाचे तिकीट कापून दिली संधी
भाजपने मंगेश झिने यांना उमेदवारी देताना पक्षातील चार वेळा नगरसेवक राहिलेले विजय इंगळे यांचं तिकीट कापलं. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तिकीट न मिळाल्याने विजय इंगळेंनी बंडखोरी करत ठाकरे गटाची उमेदवारी स्वीकारली आहे. दरम्यान, मंगेशकडे प्रचारासाठी पुरेसे आर्थिक बळ नसल्याने कार्यकर्ते, समर्थक आणि इतर उमेदवार वर्गणी काढून त्याचा प्रचार करत आहेत. पैसा नाही, मोठे पोस्टर नाहीत, झगमगाट नाही. मात्र, त्याच्याकडे आहे तो फक्त लोकांचा विश्वास आणि संघर्षाची शिदोरी.
Election 2026 : लोकशाहीचं खरं सौंदर्य
अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या मंगेश झिने यांची उमेदवारी ही केवळ एक राजकीय घटना नसून, उपेक्षितांना संधी देणाऱ्या लोकशाहीचं जिवंत उदाहरण असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वीज बिल वाटणारा एक सामान्य तरुण… आई-वडिलांच्या कष्टांचा साक्षीदार… एका खोलीत राहून मोठी स्वप्नं पाहणारा युवक… तो सर्व अडचणींवर मात करून विजयी होतो का?, याचं उत्तर 16 जानेवारीच्या मतमोजणीच्या दिवशी मिळेल. मात्र, संघर्षातून नेतृत्व घडू शकतं, हा विश्वास निर्माण करणारी ही कहाणी आज अकोल्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.