अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायलाच हवा, अमायकस क्युरीचा दावा
मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसाठी संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायलाच हवा. कारण प्रथमदर्शनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन चौकशीत अहवालात नोंदवण्यात आला आहे, असा दावा अमायकस क्युरी मंजुळा राव यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. हा एन्काउंटर खोटा असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची पोलिसांत रितसर तक्रारही केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवायला हवा होता, असंही राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता. मात्र हा एन्काउंटर नसून पोलिसांनी त्याची हत्याच केली आहे. या बनावट एन्काउंटरचा तपास स्वतंत्र तपासयंत्रणेमार्फत करावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टाकडे केली होती. पण नंतरच्या व्यापाला कंटाळत ही याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अखेर न्यायालयानं याप्रकरणात बाजू मांडण्यासाठी वरीष्ठ वकील मंजुळा राव यांची अॅम्यक्स क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. एखाद्या आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्यास नेमके काय करावं? यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर या मार्गदर्शकतत्त्वानुसार कार्यवाही झाली आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का, असा मुद्दा विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी कोर्टात उपस्थित केलाय.
मात्र राज्य सरकारच्या या भुमिकेला मंजुळा राव यांनी विरोध केलाय. मुळात याप्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशायस्पद आहे. हा एन्काउंटर बनावट असल्याच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन अहवालात नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवायलाच हवा, असा युक्तिवाद अॅड. राव यांनी केला. यावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
अहवालात काय म्हटलंय?
बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचं न्यायालयीन समितीने अहवालात म्हटलं आहे. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.