'अक्वान' आंध्र-ओडिशा किनाऱ्याकडे कूच करत आहे
90 किमी प्रतितास वेगाने वारे : दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस : 4 लाख लोकांचे विस्थापन
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर/विशाखापट्टणम
अकवान चक्रीवादळाने शुक्रवारी सकाळी 7:30 ते 8:30 च्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि ओडिशा दरम्यानच्या गोपालपूर किनारपट्टीला धडक दिली. या धडकेवेळी वाऱ्याचा वेग 70 ते 90 किमी प्रतितास होता. वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. ओडिशामध्ये सुमारे 4 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी 9,341 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त लोकांच्या बचावासाठी 400 हून अधिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
चक्रीवादळामुळे पूर्व रेल्वेने 41 एक्स्प्रेस गाड्या आणि दक्षिण पूर्व रेल्वेने 28 एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. 29 गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. या वादळाचा परिणाम 10 राज्यांवर होण्याची शक्यता गृहित धरून सावधानतेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी व्यतिरिक्त मध्य प्रदेश आणि झारखंडमध्येही हवामानात बदल झाल्याने पावसाची शक्यता आहे.
अकवान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या सर्व जिह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. किनारपट्टीच्या भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर, गंगासागर प्रशासन यात्रेकरू आणि पर्यटकांना समुद्रकिनारे रिकामे करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करत वारंवार घोषणा करत आहे.
ओडिशाच्या डारिंगबाडीमध्ये भूस्खलनाच्या धोक्यामुळे अग्निशमन दल आणि पोलिसांनी उपर किलाबाडी आणि ताला किलाबाडी या गावांमधून 90 हून अधिक लोकांची सुटका केली. सर्वांना सियांगबाली हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या मदत शिबिरात नेण्यात आले आहे. सर्वजण सध्या सुरक्षित आहेत. तसेच ओडिशाच्या गंजाम जिह्यात तारासिंग पोलीस ठाण्याच्या पथकाने मुसळधार पावसात घनदाट जंगल आणि दुर्गम भागातून एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस पथके, एनडीआरएफ आणि ओडीआरएफ पथके समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालत आहेत. ही पथके जनजागृती करणे, मदत आणि स्थलांतर सेवा पुरवणे, तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाला मदत करत असल्याचे पुरीचे पोलीस महानिरीक्षक सत्यजित नायक यांनी सांगितले.
झारखंडच्या 5 जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने शुक्रवारी झारखंडमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किमी वेगापर्यंतच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. धनबाद, बोकारो, सरायकेला-खरसावन, पूर्व आणि पश्चिम सिंहभूम या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लोहरदगा, गुमला, सिमडेगा, रांची, खुंटी, रामगड आणि जामतारा या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकवान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे छत्तीसगडच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी राजधानी रायपूरमध्येही पाऊस झाला.
राज्यात मोठे नुकसान नाही : ओडिशा सरकार
अकवान चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले. दरम्यान, संभाव्य धोक्यामुळे अंदाजे 4 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे राज्याच्या मुख्य सचिव अनु गर्ग यांनी सांगितले. काही भागात पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझड झाली असली तरी वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर तेथील नुकसानीचा अंदाज येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चक्रीवादळाने मार्ग बदलला
अकवान चक्रीवादळ सुरुवातीला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक देईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु गुरुवारी त्याने मार्ग बदलल्याने ते आंध्र आणि ओडिशा राज्यांदरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. आता त्याची पुढील वाटचाल छत्तीसगड, झारखंड या राज्यांच्या दिशेने सुरू राहील. शनिवारपर्यंत हे चक्रीवादळ आपली चाल सुरू ठेवणार असले तरी पुढे त्याची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे. वाऱ्याचा वेग मंदावला तरी पावसाचे प्रमाण कमी-जास्त राहणार असल्याने लोकांना सतर्क रहावे लागणार आहे.
Comments are closed.